नमस्ते ट्रम्प! अहमदाबादपासून आग्रामार्गे दिल्लीपर्यंत सरकारच्या पायघड्या

503
donald-trump

जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आज हिंदुस्थानात येत आहेत. आज सकाळी त्यांचे विमान गुजरातमधील अहमदाबाद येथे लॅण्ड होईल. सहकुटुंब हिंदुस्थान भेटीवर येणाऱया ट्रम्प यांच्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने अहमदाबादपासून दिल्लीपर्यंत व्हाया आग्रा अशा पायघडय़ा अंथरल्या आहेत. ट्रम्प यांच्याबरोबर एक हजार अमेरिकनांचा ताफा आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे 400 विशेष जवान आधीच हिंदुस्थानात दाखल झाले आहेत. ‘नमस्ते ट्रम्प’ असे म्हणत ट्रम्प यांच्या स्वागतासाठी सुमारे दहा हजार हार्डिंग्ज, बॅनर्स, जाहिराती लावल्या गेल्या आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह त्यांच्या पत्नी मेलोनिया ट्रम्प, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुश्नर हेसुद्धा येत आहेत. सकाळी ठीक 11.40 वाजता ट्रम्प यांचे विमान अहमदाबादमध्ये उतरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे स्वागत करतील. तेथून ते महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमात जातील आणि नंतर मोटेरा स्टेडियममध्ये आयोजित भव्य ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात सहभागी होतील.

दुपारी साडेतीन वाजता ट्रम्प यांचा ताफा आग्य्राकडे रवाना होईल. आग्रा येथील एअरपोर्ट स्टेशनमध्ये त्यांचे विमान उतरेल आणि त्यानंतर सायंकाळी प्रसिद्ध ताजमहल भेटीचा त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे. तेथून ते दिल्लीला रवाना होणार आहेत. ट्रम्प हे दोन दिवस हिंदुस्थानचा पाहुणचार घेणार आहेत. या अमेरिकन पाहुण्यांची सोमवारी रात्री राहण्याची व्यवस्था दिल्लीच्या आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. संपूर्ण हॉटेल त्यांच्यासाठी बुक करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळी ट्रम्प यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात स्वागत कार्यक्रम होणार आहे. तेथून ते राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची हैदराबाद हाऊसमध्ये बैठक होणार आहे. त्या बैठकीत द्विपक्षीय मुद्दय़ांबरोबरच अनेक मुद्दय़ांवर या दोन नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. बैठकीनंतर उभय नेते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबरोबर ट्रम्प यांची बैठक होईल आणि नंतर डीनरचा कार्यक्रम आटोपून ट्रम्प हे अमेरिकेला रवाना होणार आहेत.

ट्रम्प यांच्या स्वागताची कमान कोसळली
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी मोटेरा स्टेडियमबाहेर उभारलेली भव्य कमान आज दुपारी अचानक कोसळली. जोराचे वारे वाहू लागल्याने ही कमान कोसळल्याचे सांगितले जाते. सुदैवाने त्यावेळी तिथे कुणीही नसल्याने जीवितहानी टळली.

काय होणार बैठकीत?
ट्रम्प आणि मोदी यांच्या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. नियोजित कार्यक्रम जरी जाहीर असला तरी दोन्ही देशांमध्ये सद्या सुरू असलेल्या व्यापारी मुद्दय़ांवर एकमत होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. अमेरिकन कंपन्यांना हिंदुस्थानात आकारला जाणारा प्रचंड कर कमी व्हावा, हिंदुस्थानी बाजारपेठेत अमेरिकन कंपन्यांना जास्तीत जास्त वाव मिळावा याबरोबरच सीएए, एनआरसी कायदे तसेच धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दाही ट्रम्प यावेळी चर्चेत आणतील असे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या