ट्रम्प यांचा टॅक्स टेरर! अ‍ॅपलला धमकी… हिंदुस्थानात बनवलेले आयफोन अमेरिकेत विकाल तर 25 टक्के कर लादेन

हिंदुस्थानात किंवा इतर देशांत तयार झालेले आयफोन अमेरिकेत विकल्यास त्यावर 25 टक्के आयातशुल्क लादण्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलला दिली आहे. अॅपलने अमेरिकेत विकले जाणारे आयफोन इथेच तयार करावेत, असा आग्रह ट्रम्प यांनी धरला आहे. त्यामुळे अॅपलने आता याप्रकरणी कोणतेही पाऊल उचलले तरी त्याचे व्यापाराच्या दृष्टीने दूरगामी परिणाम हिंदुस्थानवर होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत विकले जाणारे आयफोन हिंदुस्थानात किंवा अन्य कोणत्याही देशात तयार झालेले नसावेत. आयफोनचे कारखाने हिंदुस्थानात उभारू नयेत, त्यांना त्याची गरजही नाही. ते त्यांचे बघून घेतील, असे मी अॅपलचे सीईओ टीम कुक यांना आधीच सांगितलेले आहे. तसे झाले नाही तर अॅपलला कमीत कमी 25 टक्के आयातशुल्क द्यावे लागेल, असा इशारा ट्रम्प यांनी आज ‘टथ’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिला. दरम्यान, ट्रम्प यांचा सल्ला डावलून अॅपल हिंदुस्थानातील उत्पादनात वाढ करण्याच्या बातम्या येत असतानाच ट्रम्प यांच्या धमकीमुळे हिंदुस्थानातील इलेक्ट्रॉनिक निर्मिती क्षेत्र, गुंतवणूक, व्यापारी संबंधांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.