
इराणने अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून त्यांच्या अरब शेजाऱ्यांवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहेत. या हल्ल्यांमध्ये त्या देशांमध्ये असलेल्या अमेरिकन लष्करी तळांना तसेच ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी दूतावासाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
दूतावासाने म्हटले आहे की, घटनास्थळांचे किंवा विमानतळांच्या आत अनधिकृत चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. इस्रायलच्या पाठिंब्याने अमेरिकेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेत युद्ध सुरू असताना अबू धाबी येथील हिंदुस्थानी दूतावासाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानींना घटना घडलेल्या ठिकाणांचे फोटो काढू नका किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करू नका आणि डिजिटल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा प्रतिमा अपलोड किंवा प्रसारित करू नका असा इशारा दिला आहे.
एका निवेदनात म्हटले आहे की, युएईमधील अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की घटनेच्या ठिकाणांचे, प्रतिबंधित क्षेत्रांचे किंवा विमानतळांच्या आत अनधिकृत चित्रीकरण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
सर्व हिंदुस्थानी नागरिकांना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि कायदेशीर परिणाम टाळण्यासाठी, दूतावासाने खाली सूचीबद्ध केलेल्या उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

























































