निर्भया प्रकरणाचे राजकारण करू नका, केजरीवालांनी भाजपला फटकारले

657

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीची अमंलबजावणी 1 फेब्रुवारीपर्यंत पुढे गेली आहे. त्यासाठी भाजपने दिल्लीतील केजरीवाल सरकारला जबाबदार धरले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व प्रकाश जावडेकर यांनी यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फटकारले होते. त्यांच्या या आरोपांना उत्तर देताना केजरीवाल यांनी निर्भया प्रकरणाचे राजकारण करू नका, अशा शब्दात भाजप नेत्यांना फटकारले आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केला असून त्यातून त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारने एकत्र येऊन दोषींना फासावर लटकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहनही केले आहे.

‘निर्भयाच्या दोषींची फाशी काही दिवसांसाठी टळली आहे. याचे संपूर्ण देशाला दुख आहे. आम्हालाही याचे दुख आहे. पण मला याचेही दुख आहे की एवढ्या संवेदनशील विषयाचे देखील राजकारण होत आहे. मी तीन दिवसांपूर्वी जावडेकरांचे वक्तव्य ऐकलं ते म्हणाले आपमुळे फाशीला उशीर झाला. आज स्मृती इराणींचे वक्तव्य ऐकलं. मला त्यांना विचारायचं आहे की, आपण एकमेकांना शिव्या देऊन निर्भयाच्या दोषींना फाशी होणार आहे का? ते आम्हाला शिव्या देतील, आम्ही त्यांना शिव्या देऊ. याने काहीच साध्य होणार नाही. यावेळी दिल्ली व केंद्र सरकार यांनी एकत्र येऊन दोषींना लवकरात लवकर फाशी व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे देशाप्रती, निर्भयाप्रती आपले कर्तव्य आहे. आपण सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. आपण मिळून त्यांना फासाच्या फंद्यापर्यंत नेले पाहिजे’, असे केजरीवाल यांनी या व्हिडीओतून म्हटले आहे.

तसेच यावेळी त्यांनी सहा महिन्यात दोषींना फासावर लटकवता येईल असा कायदा झाला पाहिजे व त्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे असे आवाहन देखील केले आहे. ‘निर्भयाचे दोषी आपल्या यंत्रणेतील पळवाटांचा वापर करून त्यांची फाशी पुढे ढकलत आहेत. आपल्या सर्वांचे प्रयत्न हे असले पाहिजे की आपण एक अशी यंत्रणा तयार केली ज्यामुळे दोषींना या पळवाटा काढत्या येऊ नये. आपण यंत्रनेतील त्या सर्व कमी दूर केल्या पाहिजेत. असा कायदा आपण आणला पाहिजे ज्याने महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सहा महिन्यात फाशी झाली पाहिजे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून काही होणार नाही. आपल्याला मिळून महिलांसाठी आपला देश सुरक्षित केला पाहिजे. मी यासाठी केंद्र सरकारसोबत काम करायला तयार आहे. आम्हाला या मुद्द्यावर राजकारण करायचे नाही’, असे आवाहन केजरीवाल यांनी केंद्र सरकारले केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या