जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी उगाच सत्तेच्या मागे धावू नये, संजय राऊत यांचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नितीश कुमारांना राज्यसभेत पाठवावं आणि बिहारचं नेतृत्व भाजपच्या नेत्याकडे द्यावं, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी उगाच सत्तेच्या मागे धावू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सत्ता येते, सत्ता जाते. आम्हाला जनतेने विरोधी पक्षात जबाबदारी दिलेली आहे आणि ती आम्ही योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशात सध्या सरकार अपयशी ठरलेली आहेत. भाजपसमोर प्रश्नांचा डोंगर आहे. अशा वेळी जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाने काम करावं लागेल. जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी उगाच सत्तेच्या मागे धावू नये, येणाऱ्या पुढील निवडणुकांची तयारी करावी आणि लोकांपर्यंत पोहोचावं, हे आमचं सगळ्यांचं मत आहे.

विनोद तावडे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यावर संजय राऊत म्हणाले की, विनोद तावडे यांच्यासारखे कार्यकर्ते कोणत्याही पक्षात असतात आणि ते सतत पक्षाचं काम करत असतात. मी विनोद तावडे यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांचं कार्य सुरू झालं आहे. मग महाराष्ट्र, दिल्ली किंवा बिहार अशा विविध ठिकाणी त्यांनी काम केलं. अशा वेळी जर पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत उमेदवारी दिली, तर तो एका कार्यकर्त्याचा सन्मान असतो. महाराष्ट्रातून काही लोकांनी त्यांना राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एका विशिष्ट गटाने विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण विनोद तावडे नाउमेद न होता त्यांनी संघटनेत काम सुरू ठेवले आणि संघटना बांधण्याचे काम केले. ते दिल्लीमध्ये सुरुवातीला पक्ष सचिव म्हणून गेले, मग सरचिटणीस झाले. त्यानंतर त्यांच्यावर अनेक राज्यांची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी नेतृत्वाचा विश्वास संपादन केला आणि त्यामुळेच त्यांना हे यश मिळालं. भारतीय जनता पक्षाने दिलेले उमेदवार कौतुकास्पद आहेत, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेच्या जागा जनता दल (यु) पेक्षा जास्त आहेत आणि माझ्या माहितीनुसार जवळपास 40 जागांनी जास्त आहेत. नितीश कुमार यांचा सन्मान म्हणून त्यांना सुरुवातीला मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. पण नितीश कुमार यांची प्रकृती आणि मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याची माहिती सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने असा निर्णय घेतला असेल की नितीश कुमारांना राज्यसभेत पाठवावं आणि बिहारचं नेतृत्व भाजपच्या नेत्याकडे द्यावं, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही.

रोहित पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काल अजित दादांच्या अपघाताबाबत, घातपाताचा संशय आणि इतर अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. रोहित पवारांनी त्यांना काही प्रेझेंटेशन दिलं. त्यावर उद्धव साहेबांचं स्पष्ट मत आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. अजित दादा पवार यांच्या बाबतीत त्यांचं कुटुंब काही बोलायला तयार नाही, भारतीय जनता पक्ष काही बोलायला तयार नाही आणि इतर कोणीही बोलायला तयार नाही. काय दडवत आहात, काय लपवत आहात, असं कोणतं रहस्य आहे, हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. तुम्ही तपास का होऊ देत नाही? तुम्ही कोणाला वाचवत आहात? असा प्रश्न रोहित पवार विचारत असतील, तर तो योग्यच आहे. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना तेच सांगितलं की या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे.

शरद पवार हे कालच रुग्णालयातून घरी आले आहेत आणि त्यांच्यावर अजूनही काही प्रमाणात उपचार सुरू आहेत. जसं माझ्यावर गर्दीत जाऊ नये असं डॉक्टरांनी बंधन घातलं होतं, तसंच बंधन अजूनही माझ्यावर आहे. मात्र वयानुसार फरक आहे आणि त्यांनाही फार गर्दीत जाऊ नये, असं बंधन आहे. ज्या कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया आहेत त्या त्यांच्या निवासस्थानी ‘सिल्वर ओक’ येथे पूर्ण केल्या जातील. त्यानंतर उमेदवारी अर्ज आम्ही सगळे मिळून विधानभवनातील राज्यसभा निवडणूक कार्यालयात दाखल करू असेही संजय राऊत म्हणाले.