दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दूरदर्शनचा एक प्रसिद्ध चेहरा आणि लोकप्रिय वृत्तनिवेदीका सरला माहेश्वरी यांचे गुरुवारी (१२ फेब्रुवारी) निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने माध्यम जगत आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दूरदर्शनने सोशल मीडियावर माहिती शेअर केली आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर दिल्लीतील निगम बोध घाट येथे त्यांचे अंत्यसंस्कार होतील.

मृदू आवाजासाठी आणि प्रभावी सादरीकरणासाठी सरल माहेश्वरी सर्वज्ञात होत्या. प्रेक्षकांच्या नजरेत त्यांनी एक विशेष स्थान निर्माण केले होते. १९८० आणि १९९० च्या दशकातील त्या सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन मीडिया चेहऱ्यांपैकी एक होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने लोकांवर एक वेगळी छाप सर्वांवर पाडली होती. एकेकाळी त्यांना वृत्त माध्यमांचा एक विश्वासार्ह चेहरा मानले जात असे. त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी असंख्य लोकप्रिय कार्यक्रम आणि विशेष प्रसारणे सादर करून स्वतःला सिद्ध केले होते.

सरला माहेश्वरी २००५ पर्यंत दूरदर्शनसाठी न्यूज अँकर म्हणून काम करत होत्या. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पीएचडी मिळवली. त्यानंतर, त्यांनी दूरदर्शनसाठी ऑडिशन दिले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला उद्घोषक म्हणून सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बातम्या वाचण्यास सुरुवात केली.

दूरदर्शनने त्यांच्या सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली असून, यामध्ये त्यांनी म्हटले की, सरला माहेश्वरी यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली. त्या दूरदर्शनच्या आदरणीय वृत्तनिवेदीका होत्या. तसेच त्यांच्या आवाजाने आणि अचूक उच्चारांच्या सादरीकरणाने हिंदुस्थानी वृत्तजगतात एक विशेष स्थान निर्माण केले होते.