
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल संशयाचा धूर अजूनही कायम आहे. ती दुर्घटना नव्हती, तर घातपात होता असा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच आमदाराने चौकशीची मागणी केली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनेही या दुर्घटनेबद्दल शंका व्यक्त केली आहे.
अजित पवार यांचा 100 टक्के घात झाला, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. धूर नव्हता पण धोका होता, असे म्हणत त्यांनी या दुर्घटनेमागचे सत्य बाहेर आले पाहिजे अशी मागणी केली आहे. या दुर्घटनेमागचे सत्य बाहेर काढण्यासाठी आपण जिवंत असेपर्यंत लढा देत राहू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मिटकरी यांनी रविवारीही एक ट्विट करत यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. विमानात 6 व्यक्ती होत्या, मग 5 मृतदेहच कसे सापडले, विमान जळून खाक झाले मग कागद का जळले नाहीत, असे प्रश्न त्यांनी विचारले होते.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून रचला गेला कट – वडेट्टीवार
अजित पवार यांच्या मृत्यूबाबत अनेक संशय व्यक्त होत आहेत, आरोप होत आहेत. त्यांची चौकशी निष्पक्षपणे झाली पाहिजे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आणि घाईघाईने त्यांचा शपथविधी केला गेला. परिस्थितीचे कोणतेही भान राखले गेले नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नयेत म्हणून हा कट शिजला, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दोन्ही पक्ष विलीन होण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात होती. आपल्या पक्षाबाबत त्यांनी भाजप किंवा मुख्यमंत्र्यांना सांगणे अपेक्षित होते का? त्यांच्या पक्षाचे निर्णय ते घेऊ शकत नव्हते, की त्यासाठी भाजपची परवानगी लागत होती, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
काहीतरी गडबड झाली आहे – भुजबळ
मी जेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो तेव्हा मला हा प्रश्न पडला की विमान इथे आलंच कसं काय? टेबलटॉप आहे तर विमान साधारण 70 फूट खाली कोसळलं? सीसीटीव्ही कव्हरेज आम्ही पाहिलं, एक घिरटी घालून विमान गेल्यानंतर दुसऱया घिरटीच्या वेळी सरळ असलेलं विमान पलटी मारताना दिसतं आहे आणि त्यानंतर होत्याचं नव्हतं झालं. चौकशी होईल, मी काही त्यातला तज्ञ नाही पण कुठे तरी काही तरी गडबड झाली आहे, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.



























































