स्थलांतरित मजूर, कोरोना रुग्णांसाठी जालन्याचे डॉक्टर कुटुंब ठरलं देवदूत, डॉ. चंचल आनंद कुटुंबीयांची नि:स्वार्थ सेवा

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून हजारो स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी, त्यांच्या प्रवासासाठी देवदूत बनून काम करणाऱया डॉ. चंचल आनंद डॉक्टर कुटुंबाच्या कार्याचा सध्या चहुबाजूंनी गौरव होत आहे. स्वतःचे रुग्णालय सांभाळून जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात मोफत सेवा देताना डॉ. चंचल यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्या कोरोनाशी लढत आहेत. त्यांची प्रकृती आता सुधारत असून समाजाच्या सेवेत लवकरच रुजू होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच संपूर्ण राज्यात प्रसार झाला. वाढच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हजारो स्थलांतरित मजुरांनी आपल्या गावची वाट धरली. मात्र मोलमजुरी करणाऱया, हातावर पोट असणाऱया हजारो मजुरांकडे आपल्या घरी जाण्यासाठीही पैसे नव्हते. अशा वेळी जालन्यातील या आनंद नावाच्या डॉक्टर कुटुंबाने देवदूताप्रमाणे धावून येत या गोरगरीबांना मदत केली. हजारो स्थलांतरित मजुरांना केवळ दोन वेळचे जेवणच नाही तर राहण्यापासून चप्पलची सुविधाही त्यांनी उपलब्ध करून दिली. डॉ. चंचल यांच्यासोबत त्यांचे डॉक्टर पती, डॉक्टर आई-वडील, भाऊ-वहिनी, अग्रवाल कुटुंबीय त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.

गोरगरीबांसाठी सुरू केले कोविड केअर सेंटर

डॉ. चंचल यांच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्यांनी 40 खाटांचे कोविड केअर सेंटरही सुरू केले. या दोन्ही ठिकाणी सेवा देत असतानाही त्यांनी जालना सिव्हिल रुग्णालयात मोफत सेवा दिली. ही सेवा देत असतानाही त्यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती खालावली असताना आवश्यक ती वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्यासह जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे सहकार्य झाल्याची माहिती संभाजीनगरचे नगरसेवक चेतन कांबळे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या