नेत्रहीन डॉ. दिव्या बिजूर यांनी गायलं ‘विकून टाक’ चित्रपटासाठी गीत

आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करून गरूडझेप घेतलेली अनेक उदाहरणे आहेत. त्यातच आता डॉ. दिव्या बिजूर या तरुणीच्या नावाची भर पडली आहे. नेत्रहीन असलेल्या 33 वर्षांच्या डॉ. दिव्या यांनी ‘विकून टाक’ या चित्रपटासाठी एक प्रेमगीत गात चित्रपट गायनाचा श्रीगणेशा केला आहे. त्यांनी गायलेल्या गाण्याचे बोलही डोळ्यांशी संबंधितच आहेत. हे बोल आहेत, ‘डोळ्यांमंदी तुझा चांदवा’!

उत्तुंग ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ या चित्रपटाच्या निमित्ताने हा योग जुळून आला आहे. हा चित्रपट अवयव दान या एका गंभीर विषयावर अत्यंत खेळकरपणे भाष्य करतो. ‘मी जन्मापासूनच दृष्टिहीन आहे. ऑप्टिक नर्व्ह कंडिशनमुळे मला दिसू शकत नाही. अवयव दान हे किती महत्त्वाचे आहे, हे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला चांगल्या पद्धतीने कळू शकेल,असे फिजिओथेरपीच्या डॉक्टर असलेल्या दिव्या यांनी सांगितले. ‘विकून टाक’ हा चित्रपट नेमक्या याच विषयावर खूप तरल भाष्य करतो. त्यामुळे या चित्रपटात गाण्याची संधी मिळणं ही खूप मस्त गोष्ट होती,’ असे डॉ. दिव्या यांनी सांगितले. ‘मी बघू शकत नाही. पण तरीही मन:चक्षुंनी मला कळू शकतं की, विकून टाक या चित्रपटाद्वारे जो संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे, तो संदेश नक्कीच मोठ्या प्रमाणावर पसरेल,’ असे त्या म्हणाल्या.

दिव्या यांना पहिल्यांदा गाताना ऐकलं, तेव्हाच मला जाणवलं होतं की, आपल्या चित्रपटातल्या गाण्यासाठी त्यांचा आवाज एकदम योग्य आहे. लोकांना हे गाणं आवडलं, तर आम्ही जो संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत, तो अधिक परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल, असं चित्रपटाचे निर्माते उत्तुंग ठाकूर म्हणाले. डोळ्यांमदी तुझा चांदवा, हे प्रणयगीत आहे. अगदी कोणाच्याही मनात एक गोड शिरशिरी उमटवेल, अशी चाल अमितराज यांनी दिली आहे. ‘माझ्या दादाचं लगीन’ या गाण्याप्रमाणेच हे गाणंही लोकांच्या पसंतीला उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अवयव दान या विषयाला अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने मांडणारा आणि ग्रामीण पार्श्वभूमीवर चित्रित झालेला ‘विकून टाक’ हा चित्रपट 31 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या