
डॉ. मंजिरी भालेराव
छत्रपती संभाजीनगरमधील पितळखोरा स्थळाचे सौंदर्य आणि महत्त्व वृद्धिंगत होते ते येथील शिल्पवैभवाने. गौतम बुद्धाच्या आयुष्यातील प्रसंग दाखवणारी, मानव, प्राणी आणि पक्षी यांचे मिश्रण असलेली स्फिन्क्ससारखी शिल्पं, भारवाहक यक्ष, द्वारपाल रक्षक यक्ष अशा शिल्पांनी ही लेणी समृद्ध आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील डोंगररांगांमधून वाहणारे धबधबे आणि दरीत दडलेला एक अलौकिक प्राचीन खजिना म्हणजे पितळखोरा. आतापर्यंतच्या भागात आपण येथील शैलगृह आणि अनुषंगिक शिल्प, स्थापत्य आणि जलव्यवस्थापनाची माहिती पाहिली; पण पितळखोरा परिसरातील सफाईकामात अनेक सुटी शिल्पेही मिळाली होती. त्यातील काही गौतम बुद्धाच्या आयुष्यातील प्रसंग दाखवणारी होती, तर काही भारवाहक आणि रक्षक यक्षांची होती.
गौतम बुद्धाचे महाअभिनिक्रमण सूचित करणारे अश्व आणि त्याचा छत्र धरलेला सेवक छंद यांचे रात्रीची सूचना देण्यासाठी मशाल घेऊन जातानाचे शिल्प, राजवाडय़ातील वाटाव्यात अशा व्यक्तींची काही शिल्पं या सफाई कामानंतर उजेडात आली. याशिवाय येथील उल्लेखनीय शिल्पांमध्ये विहाराच्या दरवाजाजवळचे मानव, प्राणी आणि पक्षी यांचे मिश्रण असलेली स्फिन्क्ससारखी शिल्पं यांचा समावेश होतो. चैत्यगृहात जाण्यासाठी ज्या पायऱया तयार केलेल्या आहेत त्याच्या दोन्ही बाजूंना दोन बुटके स्थूल यक्ष आणि त्यांच्या मागे एक पंख असलेला घोडा हे कोरलेले आहेत. या यक्षांनी आपल्या दोन्ही हातांनी जणू काही सगळा भार तोलला आहे, असा त्यांच्या उभे राहायच्या पद्धतीवरून आणि चेहऱयावरच्या भावांवरून आभास होतो. त्यांच्याबरोबरचा पंख असलेला घोडा म्हणजे ग्रीक पुराणकथांमधील पेगासस असावा असे वाटते. या यक्षांचे कान हे पक्ष्यांच्या पंखांसारखे आहेत. अशी चमत्कृतीपूर्ण शिल्पं कोरून जणू काही अतिमानवी शक्तीच याचे रक्षण करत आहेत असे इथे सुचवले आहे.
इथे मिळालेल्या अद्भुत शिल्पांमध्ये अजून दोन महत्त्वाच्या शिल्पांचा समावेश करावा लागतो. त्यापैकी एक म्हणजे भारवाहक यक्ष आणि दुसरा म्हणजे द्वारपाल रक्षक यक्ष. भारवाहक यक्ष हा स्थूल, बुटका आणि डोक्यावर एक उथळ पात्र घेतलेला आहे. त्याचे पाय गुडघ्यापासून खाली तुटले आहेत; पण या शिल्पाचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे, त्याच्या हातावर एक कोरीव लेख आहे.
‘कन्हदासेनहिरणकारेनकता’ म्हणजे कन्हदास (कृष्णदास) या हिरण्यकार (सोनार) याने केले आहे (दान दिले आहे). अशा प्रकारचा कोरीव लेख यक्षमूर्तींवर क्वचितच सापडतो. त्यामुळे या यक्षाचे तत्कालीन समाजात बरेच महत्त्व असणार, असे मत श्री. म.न. देशपांडे यांनी मांडले.
या सर्व शिल्पांच्या उजेडात येण्याच्या बातम्या वर्तमानपत्रात जेव्हा आल्या होत्या तेव्हा सुप्रसिद्ध कलातज्ञ श्री. प्रमोद चंद्र यांनी श्री. देशपांडे यांचे इ.स.सहाव्या शतकातील बौद्ध ग्रंथ ‘महामायूरी’ ग्रंथातील एका उल्लेखाकडे लक्ष वेधले. या ग्रंथामध्ये काही रक्षक कवच मंत्र दिले आहेत. प्राचीन काळी भिक्षूंना धर्मप्रसारासाठी पायी पायी फिरावे लागे. तेव्हा सर्पदंशाची भीती असे. जर साप चावला तर त्यांनी महामायूरी या देवतेचे आवाहन करून या ग्रंथातील मंत्र म्हणायचे, त्याचबरोबर ते ज्या गावात असतील त्या गावातील रक्षक यक्षांना आवाहन करून सर्पदंशाची बाधा होऊ नये अशी त्यांची प्रार्थना करायची. त्यासाठी भारतातील महत्त्वाच्या व्यापारी केंद्रांची आणि तेथील रक्षक यक्षांची यादी ‘महामायूरी’ या ग्रंथामध्ये दिली आहे. त्यामध्ये ‘पितंगल्य’ येथील रक्षक यक्ष ‘संकारीन’ नावाचा होता असा उल्लेख आहे. ‘पितंगल्य’ म्हणजे पितळखोरा आणि तिथे सापडलेला, हातावर कोरीव लेख असलेल्या यक्ष म्हणजे ‘संकारीन’, असा निष्कर्ष श्री. देशपांडे यांनी काढला. त्यावरून पुढे 1961मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याला जेव्हा 100 वर्षे पूर्ण झाली तेव्हा या यक्षाचे चित्र देऊन टपाल तिकीटही काढले गेले.
यानंतर पुरातत्त्वज्ञ डॉ. म.श्री. माटे यांनी प्राचीन भारतीय कलेत दिसणारा भारवाहक यक्ष आणि त्याचे सेवक किंवा तत्सम असे खालच्या दर्जाचे स्थान असल्याचे पुरावे देऊन हे शिल्प ‘संकारीन’ याचे नसावे असे प्रतिपादन केले. त्यांनी दाखवून दिले की, ‘महामायूरी’ या ग्रंथात विविध व्यापारी केंद्रांच्या रक्षक यक्षांची यादी जरी दिली असली तरी त्यांची त्या ठिकाणी मंदिरे होती की त्यांच्या मूर्ती होत्या की त्यांची अमूर्त रूपात पूजा केली जात असे याबद्दल काही स्पष्ट निर्देश नसल्यामुळे, त्याची मूर्ती करून त्याची पूजा केली जात असावी अशीही शक्यता नसल्याचे नमूद केले.
पितळखोरा येथील चैत्यगृहाच्या आणि विहाराच्या समोरच्या साफसफाईत अजून एक मोठे शिल्प सापडले. चैत्यगृहाच्या दरवाजाशेजारी हे शिल्प असावे असे या अहवालात नमूद केले आहे. या शिल्पाचेही गुडघ्यापासून खाली पाय तुटले आहेत. पण जर ते जोडले तर जवळ जवळ 7 फुटांपेक्षा जास्त उंचीचे हे शिल्प होते असे लक्षात येते. त्याच्या हातात त्याने बहुतेक तलवारीसारखे शस्त्र धरले असावे, जे आज तुटले आहे. कमरेला एक सुरा पण खोचलेला दिसतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, याचेही कान पक्ष्यांच्या पंखांसारखे आहेत आणि त्याने कानात सर्पकुंडले घातली आहेत. यावरून जशी पक्ष्यांना इतरांपेक्षा आधीच संकटाची जाणीव होते तशीच यालाही होते, असे कदाचित यामधून कलाकाराला सुचवायचे असेल. तसेच जे जनावर जंगली, विषबाधा करू शकणारे आहे, म्हणून त्यापासून लोक लांब पळतात, ते जनावर हा यक्ष कानात दागिन्यांसारखा सहज घालतो आहे. म्हणजे त्याला सर्प काहीही करू शकत नाहीत हेच यातून सुचवायचे आहे. कदाचित ‘महामायूरी’मधला सर्पदंश निष्प्रभ करणारा यक्ष म्हणजे ‘संकारीन’ हाच तर नाही ना, असाही प्रश्न आपल्याला पडून जातो. पक्ष्यांच्या पंखासारखे कान हे पाश्चिमात्य पुराणकथांमध्ये दिसणाऱया एल्फ किंवा पिक्सी यांच्या कानासारखे आहेत. तत्कालीन युरोपीय कथांमध्ये यासंबंधीच्या कथा होत्या की नाही हे माहीत नाही, पण इथे असलेल्या अद्भुत शिल्पांमध्ये परकीय प्रभावाची काही शिल्पे असल्यामुळे कदाचित हाही परकीय प्रभाव असू शकेल. यवनांच्या निवासासाठी प्रसिद्ध असलेल्या धेनुकाकट या गावातील एका व्यक्तीचा दानलेख इथे मिळाला आहे हेसुद्धा नोंद घेण्यासारखे आहे.
अशा प्रकारे अलौकिक शिल्प, स्थापत्य आणि त्याला साथ देणारा रम्य निसर्ग हे पितळखोरा या स्थळाचे सौंदर्य आणि महत्त्व वृद्धिंगत करतात हे नक्की!
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)
[email protected]























































