वीजपुरवठा खंडित होताच मुंबईची यंत्रणा आयलँडिंगवर का गेली नाही, ऊर्जामंत्र्यांनी घेतली टाटा पॉवरची झाडाझडती

मुंबईचा 12 ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर मुंबईच्या संपूर्ण वीज यंत्रणेचे आयलँडिंग होणे अपेक्षित होते. मात्र ते न झाल्याने मुंबईकरांना बत्ती गुलचा सामना करावा लागला. याबाबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज टाटा पॉवरची चांगलीच झाडाझडती घेतली.

महापारेषणच्या वीज वाहिन्यांमधून होणारा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर मुंबईचे आयलँडिंग का झाले नाही, बाहेरून होणारा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा अतिरिक्त वीज पुरवण्याची जबाबदारी तुमची आहे, मग तुम्ही ती का पार पडली नाही आशा शब्दांत ऊर्जामंत्र्यांनी टाटा पॉवरच्या अधिकाऱ्यांना सुनावले.

मुंबईच्या खंडित वीज पुरवठय़ाच्या पार्श्वभूमीवर आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऐरोली येथील राज्य भार प्रेषण केंद्राला (एसएलडीसी) भेट देऊन आढावा घेतला. यावेळी टाटा पॉवरच्या अधिकाऱयांनी मुंबईची आयलँडिंग यंत्रणा नेमकी कशी आहे याबाबत सादरीकरण केले.

महापारेषणच्या वीज वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होताच अदानीची यंत्रणा आयलँडिंगवर गेल्याने अत्यावश्यक सेवेला 350-400 मेगावॅट वीज पुरवठा सुरू होता. मात्र टाटा पॉवरकडून आयलँडिंग झाले नाही. दरम्यान राज्यभरातून मुंबईला होणारा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीज यंत्रणेचे आयलँडिंग करणे, शहराला अतिरिक्त वीजपुरवठा करणे ही तुमची जबाबदारी असतानाही ती पूर्ण न करता तुम्ही तुमच्या चुका दडवत आहात का असा सवाल डॉ. नितीन राऊत यांनी टाटा पॉवरच्या अधिकाऱयांना केला.

तसेच मुंबईत संसद असती आणि पंतप्रधान बोलत असताना वीज पुरवठा खंडित झाला असता तर तेव्हाही अशीच जबाबदारी एकमेकांवर ढकलली असती का असा सवालही केला. यावेळी ऊर्जा सचिव असिमपुमार गुप्ता, महापारेषणचे एमडी दिनेश वाघमारे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या