कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराची गंभीर दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने अशा घटना रोखण्यास उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय टास्क फोर्सचे गठन केले. वैद्यकीय क्षेत्रातील दहा तज्ञ त्यात असून मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांचाही त्यात समावेश आहे. टास्क फोर्समध्ये समावेश झालेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव डॉक्टर आहेत.
आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे काम टास्क फोर्सवर सोपवण्यात आले आहे. डॉ. पल्लवी सापळे यांचे वैद्यकीय शिक्षण जे. जे. रुग्णालयातच झाले आहे. त्या अनुभवी बालरोगतज्ञ आहेत. 2019 पासून जे. जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठाता म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यातील अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिष्ठाता म्हणून काम केले होते.
पुणे येथे झालेल्या पोर्शे कार हिट अॅण्ड रन प्रकरणाच्या चौकशीमध्ये ससून रुग्णालयात घोटाळा झाला होता. त्याच्या चौकशीसाठी डॉ. सापळे यांच्या नेतृत्वाखालीच समिती नेमली गेली होती. त्या समितीच्या अहवालामुळेच आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ससूनमधील डॉक्टरांचा पर्दाफाश झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू, असे डॉ. सापळे यांनी सांगितले.