मुद्दा – मनाची आंतरिक स्वच्छताही महत्त्वाची!

दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस ‘नॅशनल क्लीनिनेस डे’ म्हणून साजरा करून महात्मा गांधींना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली जाते. कारण गांधीजींनी त्यांच्या विचारांत आणि कार्यात स्वच्छतेला विशेष स्थान दिले होते. त्यांचे विचार आणि स्वच्छतेचे महत्त्व समजून प्रत्येकाने हे सद्गुण आपल्या जीवनात आत्मसात केले पाहिजेत. स्वच्छ वातावरण प्रत्येकासाठी आनंददायी असते. पर्यावरण स्वच्छ व निरोगी ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. स्वच्छता राखणे हा निरोगी जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता आणि सफाई ही आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. कुटुंबातील ज्येष्ठांनी मुलांना आपले वातावरण स्वच्छ ठेवण्याची गरज शिकवली पाहिजे. प्रदूषण आणि अस्वच्छतेच्या घातक धोक्याबद्दल लोकांचे अज्ञान त्यांना वेदनादायक मृत्यूच्या उंबरठय़ावर आणते.

जेव्हा स्वच्छतेचा प्रश्न येतो, तेव्हा माणूस फक्त स्वतःचा विचार करतो, समाजाप्रति असलेल्या कर्तव्याचा नाही. लोक नेहमी सर्वत्र अस्वच्छता पसरवताना दिसतात. घाणीमुळे डास, माश्या, कीटक, विषाणू निर्माण होतात व पर्यावरण प्रदूषित होऊन रोगराई पसरते. आपण ज्या वातावरणात राहतो तेच वातावरण आपण गलिच्छ बनवीत आहोत ही सर्वांसाठी शरमेची बाब आहे. विकसित देशांमध्ये स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो. स्वच्छतेशी संबंधित समस्येसाठी जबाबदार व्यक्तीला तुरुंगवास आणि मोठय़ा प्रमाणात दंडाची शिक्षाही दिली जाते. परदेशात स्वच्छताविषयक कायदे कडक आहेत. म्हणूनच तेथील परिसर इतका सुंदर, स्वच्छ आणि प्रगतशील दिसतो. कारण कायदे शिस्तबद्ध पद्धतीने पाळले जातात.

आपल्या देशात स्वच्छतेबाबत जागरूकता नसल्यामुळे अनेक निसर्गरम्य ठिकाणे, नद्या, तलाव, समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, पर्यटन व धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी मोठय़ा प्रमाणात घाण आणि कचरा दिसून येतो. शहरात कुठेही उघडय़ावर कचरा जाळणे हा कायदेशीर गुन्हा आहे. कचरा जाळल्याने वातावरणात विषारी वायू पसरतो. तरीही अनेक जण उघडय़ावर कचरा जाळतात. लोकांना ना सरकारची भीती, ना समाजाची. प्रत्येक जण आपापल्या स्वार्थाच्या परीने जगतो. शहरातील सोसायटय़ांभोवती, मोकळय़ा जमिनीवर किंवा रस्त्याच्या कडेला अनेकदा कचऱ्याचे मोठे ढीग दिसतात. काही ठिकाणी लोक कसलीही काळजी न घेता थेट फ्लॅट किंवा इमारतीच्या बाल्कनीतून कचरा खाली फेकतात. इतर लोकदेखील एकमेकांकडे पाहून त्या असभ्य वर्तनाची कॉपी करतात. लोक फक्त स्वतःची आणि घराची स्वच्छता ठेवतात, पण त्यांच्या वाईट वागण्याने समाजाचे किती नुकसान होते याबद्दल कधीच विचार करीत नाहीत. हा त्यांच्या अशुद्ध विचारांचा दोष आहे. आपले घर, परिसर, गाव, शहर, राज्य, देश हे सर्व एक असून या सर्वांचा विचार करत स्वच्छतेचा संकल्प घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.

समाजातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायची असेल तर त्यात लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. लोकसहभाग तेव्हाच साध्य होऊ शकतो, जेव्हा लोक तयार होतील आणि आपली जबाबदारी समजून घेतील. त्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. अर्थातच समाजाच्या शुद्धीकरणाबरोबरच लोकांचे विचारही शुद्ध झाले पाहिजेत. हा स्वच्छतेचा महत्त्वाचा भाग आहे. परोपकाराच्या भावनेने निःस्वार्थीपणे कोणाची तरी मदत करणे, कोणाच्या दुःखात सहभागी होणे, रडणाऱ्या चेहऱ्यावर हसू आणणे, त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान हे वेगळेच असते, जे आपण कुठूनही विकत घेऊ शकत नाही. बाह्य कचरा मानवी आरोग्यास आजार देतो, परंतु माणसाच्या मनातील आंतरिक कचरा मानसिक विकारांना जन्म देतो आणि त्याचे खूप गंभीर परिणाम होतात. एखाद्याच्या चुकीने संपूर्ण मानवी समाजावर परिणाम होतो. अशुद्ध विचारांमुळे शंका, स्वार्थ, अपराधीपणा, न्यूनगंड, लोभ, भेदभाव, घाणेरडे विचार, इतरांमध्ये दोष शोधणे, घमेंड, अहंकार, भांडखोरपणा यांसारख्या वाईट गोष्टी मानसिक विकार निर्माण करतात. द्वेष, राग, मत्सर, दुराचार हे माणसाला रानटी प्राण्यासारखे बनवतात. मन आणि मेंदूमध्ये पसरलेली घाण चुकीच्या कृत्यांना प्रोत्साहन देऊन समाजातील समस्या वाढवते. माणसाचे चारित्र्य आणि वागणूक हे त्याच्या विचारांचे फलित असते. आपल्या मनातून असा घाण, अशुद्ध विचारांचा कचरा काढून टाकला तर आपोआपच समाजातील आपल्या कर्तव्याची जाणीव होईल. आपण आपल्या चांगल्या वर्तनाने सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत समाजातील कचऱ्याची समस्या दूर करून मोठी कामगिरी करू शकू आणि सर्वत्र स्वच्छ, निरोगी वातावरण व आनंददायी विकास होईल.

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम ([email protected])