
डॉ. समिरा गुजर-जोशी
हा हेम किं न तत्रैव विलीनो दहनोदरे । पाषाणशकलाधीनो यद्गुणग्रामनिर्णय ।
अग्निदाहे न मे दुःखं न दुखं ग्रावघर्षणे । एकमेव महद्दुःखं गुञ्जया सह तोलनम् ।।
या श्लोकामध्ये कवी सोन्याच्या तोंडून एक अत्यंत मार्मिक भावना व्यक्त करतो. ‘हे सोने अग्नीच्या उदरातच का विलीन होत नाही? कारण त्याचे गुणधर्म ठरवण्याची जबाबदारी दगडाच्या तुकडय़ांवर (पाषाणावर घासून पाहणाऱया कसोटीवर) सोपवलेली आहे. मला अग्नीमध्ये जळावे लागले तरी त्याचे दुःख नाही किंवा दगडावर घासले गेले तरी त्याचेही दुःख नाही; पण एकच मोठे दुःख आहे ते म्हणजे मला गुंजा (अत्यंत हलक्या, क्षुल्लक बियांसोबत) तोलले जाते. या प्रतिमेतून कवी अतिशय सूक्ष्म सामाजिक सत्य मांडतो. खऱया गुणवत्तेच्या व्यक्तीला कठीण परीक्षा, संकटे किंवा तपश्चर्या यांची भीती नसते, कारण त्या त्याच्या मूल्याला अधिक स्पष्ट करतात. पण जेव्हा त्या व्यक्तीचे मूल्यमापन अयोग्य, क्षुल्लक किंवा कमी समज असलेल्या लोकांच्या हातात जाते, तेव्हा खरे दुःख निर्माण होते. सोन्यासाठी अग्नी आणि घर्षण हे त्याच्या शुद्धतेची चाचणी आहेत; पण त्याची तुलना गुंजेसारख्या नगण्य गोष्टीशी केली जाणे, हीच खरी वेदना आहे.




























































