संस्कृतायन – श्रीहर्षाचे नैषधीय चरित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. समिरा गुजर जोशी

प्राचीन कान्यकुब्ज अर्थात कनोजचा महाकवी श्रीहर्ष ज्याची ख्याती, त्या काळात विद्वानांची परीक्षा घेणाऱया सर्वोच्च स्थानी म्हणजे कश्मीरमध्येही पसरलेली होती. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात जयंतचंद्र राजाच्या दरबारी असलेल्या श्रीहर्षने सात ग्रंथ लिहिले, पण आपल्याला परिचित आहे ते त्याचे नैषधीय चरित हे महाकाव्यच.

संस्कृत साहित्यातील पाच महत्त्वाची महाकाव्ये, जी संस्कृत काव्याचे पंचप्राण मानले जातात. त्यापैकी चार महाकाव्यांची तोंडओळख आपण करून घेतली. या लेखापासून श्रीहर्षाच्या ‘नैषधीय चरित’ या महाकाव्याची ओळख करून घेऊ. सुदैवाने इतर कोणत्याही महाकवीपेक्षा श्रीहर्ष स्वतविषयी अधिक माहिती देतो. त्याने या महाकाव्याच्या प्रत्येक सर्गाच्या शेवटी आणि ग्रंथ समाप्तीनंतर काही श्लोक मुद्दाम यासाठी रचले आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी बरीच विश्वसनीय माहिती मिळते.

हा कान्यकुब्ज अर्थात कनोजचा रहिवासी. त्याचे वडील श्रीहीर पंडित हेसुद्धा मोठे विद्वान आणि राजकवी होते. त्याच्या आईचे नाव मामल्लदेवी. तो विजयचंद्र आणि जयंतचंद्र या कनोजच्या राजांच्या कारकीर्दीत झाला. या दोन्ही राजांचा काळ म्हणजे बाराव्या शतकाचा उत्तरार्ध मानला जातो.

आता हा जयंतचंद्र म्हणजे गढवाल रजपूत राजा जयचंद राठोड. नाव वाचल्याबरोबर तुम्हाला पृथ्वीराज चौहान आणि संयोगिता यांच्या प्रेम कहाणीची आठवण झाली असेल. (अर्थात आज अनेक इतिहासाचे अभ्यासक हे ही प्रेम कहाणी एक दंतकथा मानतात.) पण पृथ्वीराज चौहान राजाला समकालीन जयंतचंद्र राजाच्या पदरी श्रीहर्ष होता हे ऐतिहासिक सत्य आहे. त्याने नैषध काव्य इ. स. 1193-95 च्या सुमारास लिहिले असावे. तसे त्याने सात ग्रंथ लिहिले, पण आपल्याला परिचित आहे ते त्याचे महाकाव्यच. त्याच्याविषयीदेखील काही दंतकथा प्रसिद्ध आहेत.

त्यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची, जीवनाची किंचित कल्पना येऊ शकते. असं म्हणतात की, त्याचे वडील श्रीहीर पंडित यांचा उदयनाचार्य नावाच्या एका पंडिताने पराभव केला. हा पराभवाचा सल बाळगत त्यांनी श्रीहर्षाला लहानाचे मोठे केले. उदयनाचार्याचा पराभव करणे हे त्याच्या आयुष्याचे उद्दिष्ट बनले.

यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. त्रिपुरादेवी ही त्याच्यावर प्रसन्न झाली. तिने त्याला चिंतामणी मंत्र दिला. आपली तयारी पूर्ण झाली हे लक्षात आल्यावर तो जयचंद्राच्या दरबारात आला. त्याने उदयनाचार्याला आव्हान दिले. स्वतच्या प्रतिभेने रचलेला एक श्लोक त्याने तिथेच राजासमोर सादर केला.
गोविन्द-नन्दनतया च वपुःश्रिया च
मास्मिन्नृपे कुरुत कामधियं तरुण्य।
अस्त्राr-करोति जगतां विषये स्मर स्त्री
अस्त्राrजन पुनरनेन विधीयते स्त्री?
हा राजा गोविंदाचा पुत्र असून देखणा आहे, पण मुलींनो, त्याला मन्मथ समजू नका. का? कारण मन्मथ स्त्रियांच्या सहाय्याने जग जिंकतो, तर हा राजा पुरुषांचे सामर्थ्य हिरावून त्यांना स्त्रियांप्रमाणे (निर्बल) बनवतो. आता या काव्यातील कल्पना नावीन्यपूर्ण आहे. श्लेष अलंकाराचा वापर सुरेख आहे.

मन्मथ जग जिंकण्यासाठी स्त्रियांनाच आपली अस्त्र (अस्त्री-करोति) म्हणून वापरतो हे सर्वश्रुत आहे, पण राजा त्या मन्मथाच्याही पेक्षा अधिक पराक्रमी आहे. कारण तो काय करतो? तर ‘अस्त्राrजन’ म्हणजे शस्त्रधारी (म्हणजे शत्रू) लोक. त्यांना हा राजा सहज पराभूत करतो. त्यांचे सामर्थ्य हिरावले गेले की ते निर्बल होतात. जणू ते स्त्रियांसारखे असहाय्य होतात. (अस्त्रीजन पुनरनेन विधीयते स्त्री) असं म्हणतात की, हा एक श्लोक ऐकूनच उदयनाचार्याने आपला पराभव मान्य केला. श्रीहर्षाने स्वत विषयी जे श्लोक लिहिले आहेत त्याचा आत्मविश्वास आणि जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा लक्षात येते. तो त्याच्या पांडित्यासाठी ओळखला जातो. कश्मीर हे पूर्वी विद्वानांची परीक्षा करणारे सर्वोच्च स्थान मानले जाई. तेथील विद्वानांनीही श्रीहर्षाचा गौरव केला होता हे स्वत श्रीहर्षही सांगतो.

त्याच्याविषयी एक अशीही कथा आहे की, तो कश्मीरमध्ये असताना नदीकिनारी बसला होता. योगायोगाने तिथे पाणी भरण्यासाठी आलेल्या दोन युवती तेथील स्थानिक भाषेत त्याच्यासमोर भांडल्या. त्या दोघींचे भांडण राजा समोर गेले आणि तेथे उपस्थित साक्षीदार म्हणून त्यालाही दरबारात बोलावण्यात आले. त्याला ती भाषा येत नव्हती. मग आता भांडणाविषयी हा काय सांगणार? पण या बहाद्दराने काय सांगितले? म्हणाला मला भाषा येत नाही, पण मी ऐकले ते ध्वनी माझ्या लक्षात आहेत आणि त्याने त्या दोघींचे भांडण त्याला भाषा येत नसताना घडाघडा म्हणून दाखवले. आता बोला! अशा या विद्वान कवीकडे खाशी विनोदबुद्धीही होती आणि नल-दमयंतीची प्रेम कहाणी रंगवण्याची रसिकताही. त्याविषयी पुढील लेखात पाहू.
(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि
संस्कृत – मराठी वाङ्मयाच्या अभ्यासक आहेत.)
[email protected]