सृजन संवाद – शबरीची बोरे

>> डॉ. समिरा गुजर जोशी

मूळ वाल्मीकी रामायणात लोकपरंपरेने किती वेगवेगळ्या प्रकारे भर घातली आहे हे पाहणे खूप रंजक ठरते. कारण या गोष्टींचा आपल्या मनावर विलक्षण पगडा असतो. शबरीच्या उष्टय़ा बोरांची गोष्ट ही अशीच एक अतिशय लोकप्रिय गोष्ट, पण ही गोष्ट मूळ वाल्मीकी रामायणात नाही. रामायणात शबरी ही मातंग ऋषींची शिष्या राम- लक्ष्मण यांना भेटते खरी. ती त्यांना फळे, कंदमुळेही खाऊ घालते. पण त्यात ती चाखून दिल्याचा किंवा उष्टी असल्याचा उल्लेख नाही. पण मूळ वाल्मीकी रामायणात तिथेच आणखी एका सुंदर गोष्टीचा उल्लेख आहे. ही गोष्ट आज किती जणांना ठाऊक आहे माहीत नाही, पण साने गुरुजींना ही गोष्ट खूप आवडायची. त्या गोष्टीचा उल्लेख त्यांनी अनेकदा केला आहे. ही गोष्ट आज जाणून घेऊ या. साने गुरुजींना ती एवढी का आवडायची हेही आपल्याला कळेल.

राम-लक्ष्मणांची कबंध राक्षसाशी भेट झाल्यानंतर “तू सुग्रीवाशी मैत्री कर. तो तुम्हाला मदत करेल’’ असा सल्ला कबंध राक्षसाने दिला आणि सुग्रीव जिथे वस्ती करून होता, त्या ऋष्यमूक पर्वताकडे जाणारा मार्गही सांगितला. या मार्गाचे वर्णन करताना त्याने सांगितले की, रस्त्यात मातंग ऋषींचा आश्रम लागेल. या ठिकाणाचे वैशिष्टय़ काय, तर इथे सुगंधी फुलांचे ताटवे फुललेले दिसतील. या फुलांचे वैशिष्टय़ म्हणजे ती बारमाही फुललेली असतात. ती कधीही कोमेजत नाहीत. त्या फुलांचा जन्मच फार विलक्षण प्रकारे झाला आहे. एकदा भयंकर दुष्काळ पडला होता. खूप लांब जाऊन लाकडे, कंदमुळे आणल्याशिवाय पर्याय नव्हता. अशा वेळी मातंग ऋषींच्या शिष्यांनी खूप परिश्रम केले. गुरूची सेवा करण्यासाठी त्यांनी अतिशय परिश्रम केले. खूप दुरून हे सगळे ते वाहून आणत होते. अतिशय निर्मळ मनाने हे कष्ट करणाऱया त्या शिष्यांचा घाम या परिसरात जमिनीवर सांडत होता. त्या घामातून फुले उमलली.

एकनाथ महाराज भावार्थ रामायणात लिहितात –
घामाचे बिंदू पडता क्षिती सुमने झाली नाना जाती
सुको नेणती कल्पांती नित्य टवटवीत मघमघित (घमघमाटासाठी वेगळा शब्द वापरला आहे.)
त्या सुमनांचा घेता वास मनाचा निरसे त्रिगुण – त्रास
मग भोगी प्रकट परेश अति उल्लास जिवाशिवा

किती सुंदर कल्पना आहे ही! गुरूची सेवा करण्यातून निर्माण झालेली फुले. सेवा करण्यातून, श्रम साधनेतून निर्माण झालेली फुले. ही फुले घामातून निर्माण झाली आणि त्यांना दैवी सुगंध प्राप्त झाला. घाम म्हणजे दुर्गंध, त्यातून निर्माण झालेला हा दैवी सुगंध. हा श्रम संस्कृतीचा सन्मान आहे. म्हणूनच गोष्ट साने गुरुजींना अतिशय प्रिय होती. मातंग ऋषींच्या आश्रमाची कल्पना करत असताना आमटे परिवाराने अशाच पद्धतीने श्रमातून उभ्या केलेल्या आनंदवनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

गुरू म्हणून मातंग ऋषींची थोरवी ही की, त्यांनी ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी खुली केली. शबरी नावाची भिल्लीण त्यांच्याकडे ज्ञानाच्या इच्छेने आली तर त्यांनी तिलाही ज्ञान दिले. तिचे स्त्री असणे, समाजाच्या खालच्या स्तरातून येणे हे काहीही तिच्या प्रगतीच्या आड आले नाही.

अशा आश्रमांची समाजाला आजही आवश्यकता आहे, जिथे प्रत्येकाला ज्ञानाचा समान अधिकार असेल. सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानाच्या या युगात श्रमांना आपण अगदी गौण स्थान दिले आहे. सेवा करण्याचा सुंदर संस्कार मागे पडतो आहे. अशा वेळी ही ‘न कोमेजणाऱया फुलांची गोष्ट’ अधिकच महत्त्वाची ठरते. आता पुन्हा शबरीच्या बोरांकडे वळायचे तर मूळ वाल्मीकी रामायणात वनात मिळणारी कंदमुळे, फळे शबरीने अर्पण केली आणि त्यांनी ती प्रेमाने खाल्ली एवढाच उल्लेख तिथे येतो. आश्चर्य म्हणजे सहसा या लोकप्रिय कथांचा उगम तुलसीदासांच्या रामचरितमानसात असतो, पण तिथेही शबरीच्या उष्टय़ा बोरांचा उल्लेख नाही. शबरीचा हा वनातील प्रसाद ग्रहण करत असताना भगवान श्रीराम भक्तिमार्गाचे श्रेष्ठत्व मात्र सांगतात. ते म्हणतात, “मी केवळ भक्तीचे नाते ओळखतो. एखाद्याजवळ पैसा आहे, सामर्थ्य आहे, नोकरचाकर आहेत, गुण आहेत, चातुर्य आहे, पण भक्ती नसेल तर हे सारे ‘पाणी नसलेल्या मेघासारखे’ व्यर्थ आहे.’’

पण मग शबरीच्या उष्टय़ा बोरांची कल्पना कुणाची? याविषयी जाणून घेऊ या पुढील लेखात.

[email protected]
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङ्मयाची अभ्यासक)