नियमांचे पालन, लसीकरणाची कास, हाच कोरोनाची तिसरी लाट रोखण्याचा रामबाण; टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांचे मत

कोविडच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन आणि लसीकरणाची कास हाच कोरोनाची तिसरी लाट रोखण्याचा रामबाण उपाय ठरू शकेल, असे मत राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले. छोटय़ा घरांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी मर्यादा असल्याने वस्ती व गावपातळीवर सामूहिक क्वारंटाइनची व्यवस्था करून ठेवणे योग्य राहील असा सल्लाही त्यांनी दिला.

पुणे येथील स्त्री आधार पेंद्र आणि प्रबोधन व्यासपीठ या संस्थांच्या वतीने ‘कोविड ः काल, आज आणि उद्या’ या दृश्राव्य कार्यक्रमाच्या शुभारंभात डॉ. संजय ओक यांनी ‘कोरोना प्रतिबंध आणि गृहविलगीकरणाच्या दक्षता’ या विषयावर मार्गदर्शन केले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. टास्क फोर्सची दर सोमवारी रात्री बैठक होते. आतापर्यंत 64 बैठका झाल्या. त्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन आरोग्य खात्यासाठी नियमावली बनवली जाते, असे डॉ. ओक यांनी सांगितले.  यापुढील तीन शनिवारी सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमातून कोरोनाविषयीची माहिती दिली जाणार आहे. नागरिकांनी त्यांचे अनुभव 500 शब्दांमध्ये लिहून 9930115759 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावे.

समाजाला जगण्याची उमेद मिळेल – डॉ. नीलम गोऱ्हे

या कार्यक्रमातून समाजाला जगण्याची उमेद आणि मानवतेचा संदेश मिळेल, असा विश्वास याप्रसंगी डॉ. नीलम गोऱहे यांनी व्यक्त केला. हा कार्यक्रम म्हणजे संजीवनी मिळून हयात असलेल्या मानवजातीचा उत्सव आहे आणि ज्यांच्या जीवनाची ज्योत मालवली त्यांच्यासाठी एक श्रद्धांजली आहे, असेही त्या म्हणाल्या. कोरोनाचे संकट अचानक ओढवल्यानंतर सरकारने केलेल्या उपाययोजना तसेच डॉक्टर्स, नर्सेस आणि अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनी समस्यांवर काढलेला तोडगा याविषयीदेखील त्यांनी यावेळी माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या