आपली काळजी! आपली जबाबदारी!!

>>  डॉ. सतीश नाईक  

जरी अनलॉकचा कालखंड सुरू झाला असला तरीही मा. मुख्यमंत्री गरज नसेल तेव्हा घरातच राहण्याचे आवाहन करीत आहेत. पण तरीही बऱयाचदा काही अपरिहार्य कारणास्तव आपल्याला कामानिमित्त बाहेर पडावेच लागते. अशावेळी कशी काळजी घ्यावी…

महामारीच्या काळात आपण घराबाहेर जाणे टाळतो. कामाशिवाय घराबाहेर पडत नसलो तरी काही वेळा असे होते की, आपले नातेवाईक, शेजारी, जवळचे मित्रमैत्रिणी किंवा आपले कुटुंबीय यांच्यापैकी कोणाला जर कोरोनाची लागण झाली तर त्यांच्या मदतीकरिता घराबाहेर जाणे अत्यंत आवश्यक असते. अशावेळी या साथीच्या काळात आपण मास्क आणि सॅनिटायझर वापरत आहोतच, पण यादरम्यान रुग्णालयात जावे लागले किंवा कोविड करोना रुग्णाशी संपर्क आला तर काय काळजी घ्यावी? करोनाचा संसर्ग नाक आणि तोंडाद्वारे होतो. कुठलाही व्हायरस हे एक प्रकारचे जीन्स असतात. जीनचा तुकडा म्हणजे हा व्हायरस आहे. व्हायरसच्या अंगावर काटे असतात. हे काटे म्हणजे लिपिड लेयर असतो. म्हणजे चरबीचा थर असतो. हा थर चिकट असल्यामुळे शरीरातील काही पेशींना असलेल्या रिसेप्टरला चिकटतो आणि तिथून तो शरीरात प्रवेश करतो. आपल्या शरीरात दोन रिसेप्टर्स आहेत.

 • नाकाच्या मज्जातंतूंना असलेले रिसेप्टर, ज्याद्वारे आपण वास घेतो. म्हणून कोरोना संसर्गाने वास यायचे बंद होते.
 • दुसरा रिसेप्टर ACE 2 या नावाचा आहे. तो श्वसनाशी संबंधित आहे. कारण याद्वारे तो व्हायरस आत शिरतो. यातून संसर्ग होतो.
 • जेव्हा तुम्ही त्या व्हायरसला आपलं तोंड आणि नाक झाकून शरीरात प्रवेश नाकारता, तेव्हा तो कुठूनही म्हणजे त्वचेतून, केस, पाय किंवा अन्नातूनही प्रवेश करत नाही.
 • हा हेवी व्हायरस आहे. म्हणजे बाकीच्या व्हायरसपेक्षा याचं वजन जास्त आहे. त्यामुळे तो हवेत जास्त काळ न तरंगता कुठल्यातरी पृष्ठभागावर बसतो. पृष्ठभागाला हात लागला तर काही कळत नाही, पण व्हायरस लागलेला हात आपल्या नाकातोंडाला लागला तर संसर्ग होऊ शकतो.
 • अन्नातून कोरोना पसरत नाही. म्हणून होम डिलिव्हरीकरिता लवकर परवानगी मिळाली. तोंडामधली लाळ आणि पोटामधलं ऍसिड यांच्यामध्ये हा व्हायरस जगत नाही. त्यातही काही रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल त्यांना जुलाब होतात.

घराबाहेर पडाल तेव्हा ही काळजी घ्याच

 • जिथे गरज नाही तिथे हात लावू नका.
 • जिथे कोंदट जागा आहे, अशा ठिकाणी जाऊ नये. उन्हात गेलात तर सहसा कोरोना होत नाही.
 • तुमच्यापासून एक मीटरच्या आत जर कोणी असेल आणि त्या व्यक्तीला सर्दी, खोकला नसेल तर तुम्हाला काही होणार नाही. म्हणून सामाजिक अंतर ठेवायला सांगितलं आहे.

संसर्ग असलेल्या व्यक्तीला स्पर्श झाला तर

 • हात नाकाला लागणार नाही याची दक्षता घ्या.
 • व्हायरस नाकात पोहोचणार नाही ही काळजी घ्या.
 • हात लागल्यानंतर किंवा इतर कशालाही हात लावण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा. कारण व्हायरसच्या शरीरावर तेलाचं (लिपिड) कव्हर असतं. साबण कुठलाही तेलकट पदार्थ धुऊन टाकतो.
 • सॅनिटायझरमध्ये 70 टक्के अल्कोहोल हवं. अल्कोहोल व्हायरसचं तेलकट कव्हर विरघळवून टाकतं. व्हायरस संपतो.
 • अल्कोहोल बेस सॅनिटायझर जवळ ठेवा. त्याने हाताची बोटं, कोपर स्वच्छ धुवा. फक्त तळहातावर घेऊन चोळू नका.
 • बाजारात गेल्यानंतर वापरलेले पैसे, नोटा 48 ते 72 तास वेगळे ठेवा. असे केले की, त्यावर व्हायरस फार टिकत नाही.
 • दरवाजा उघडणं आणि बंद करणं यासाठी एखादे कापड वापरू शकता. तसेच दार उघडबंद केलेत की, साबणाने किंवा सॅनिटायझरने हात धुवा.
 • कुठेही गर्दी करायची सवय आपल्याला बदलावी लागेल. रांगेची शिस्त आपण लावून घ्यायला हवी. आता या शिस्तीची, दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवण्याची गरज असते.

सामाजिक भान बाळगावे

औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

कोरोनाला दूर कसे ठेवाल?

नाक आणि तोंड 9 स्क्वेअर इंच झाकून घेतलं तर काहीच होणार नाही. म्हणून मास्क वापरायलाच हवा.

मास्क कसा लावायचा याची काही लोकांना पुरेशी माहिती नसते. नाक, नाकाच्या आसपासचा भाग आणि तोंडाचा भाग यामध्ये कुठे गॅप म्हणजे मोकळी जागा असू नये. गॅप असेल तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे मास्क नीट लावणं, नाक आणि तोंड व्यवस्थित झाकलेलं असणं हा कोरोनाला दूर ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे.

कोरोना सेंटर्स

 • ऑक्सिलियम हॉस्पिटल, विनायक अपार्टमेंट, रिलॅक्स हॉटेलसमोर, अडिवली , ढोकळी, कल्याण (पूर्व) – डॉ. जितेश पाटील 8976060667
 • ऑप्टिलाईफ हॉस्पिटल एन एक्स साई पॅराडाईज, पहिला मजला, विष्णू नगर, डोंबिवली (प.) 9619187198
 • डॉ. सी.बी. वैद्य मेमोरियल हॉस्पिटल, टिळक चौक, कल्याण 02512201220
 • आयकॉन हॉस्पिटल, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व) – डॉ. हिमांशू ठक्कर 8691044188
 • साई स्वस्तिक हॉस्पिटल, शिव वैभव अपार्टमेंट नंबर 2, काटेमानिवली, कल्याण (पूर्व) -डॉ. सतीश गीते 9561648727
आपली प्रतिक्रिया द्या