
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटाचे धागेदोरे पाकिस्तानात असल्याचे समोर येत आहे. फरिदाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या डॉ. शाहीन शहीदबाबत सुरक्षा यंत्रणांनी धक्कादायक माहिती उघड केली आहे. डॉ. शाहीन यांना भारतात जैश-ए-मोहम्मदची महिला संघटना “जमात-उल-मोमिनीन” च्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती.
हिंदुस्थानात महिलांची भरती करणे, ब्रेनवॉश करणे आणि त्यांचे ऑपरेशनल नेटवर्क स्थापित करणे ही शाहीनची भूमिका होती. हे नेटवर्क हळूहळू सोशल मीडियाद्वारे विस्तारत होते आणि स्थानिक समर्थकांच्या मदतीने कारवाया सुरू केल्या होत्या. शाहीन पाकिस्तानमधील तिच्या हँडलर्सशी सतत संपर्कात होती, असा दावाही तपास यंत्रणांनी केला आहे.
गुप्तचर विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सादिया अझहरने शाहीनला हे काम सोपवले होते. सादिया ही जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहरची बहीण आणि पाकिस्तानमधील महिला शाखेची प्रमुख आहे. सादियाचा पती युसूफ अझहर हा कंधार अपहरण कट रचणारा दहशतवादी आहे. सुरक्षा संस्था आता डॉ. शाहीनचे डिजिटल नेटवर्क, सोशल मीडिया कनेक्शन आणि संशयित सहकाऱ्यांची चौकशी करत आहेत.




























































