आरोग्यभान – कोरोना आणि थायरॉईड

>> डॉ. श्वेता बुदयाल

कोविड-19 ने साथीच्या रोगांच्या तज्ञांना सतत व्यग्र ठेवले आहे. कारण या विषाणूच्या नवनव्या प्रजाती येतच आहेत व आजार बरा झाल्यानंतर त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. खरे तर या मूळ विषाणूनेच आपल्याला अनेक बाबतीत थक्क करून सोडले आहे. त्याच्याबद्दलच्या अशाच एका नव्या संशोधनामुळे तज्ञांना चांगलेच चक्रावून टाकले आहे. या आजाराच्या रुग्णांमध्ये (पूर्वी थायरॉईडचा आजार नसलेल्या) सबऍक्यूट थायरॉयडायटिस हा विषाणुबाधेमुळे किंवा विषाणुबाधेनंतर उद्भवणारा थायरॉईड आजार विकसित होत असल्याचे आढळून आल्याचे ‘द जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी अँड मेटॅबोलिझम’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये असे नोंदवण्यात आले आहे. अशाच प्रकारचा कल इतर देशांतही दिसून आला आहे आणि हिंदुस्थान त्याला अपवाद नाही. म्हणूनच कोविडची लागण झाल्यावर त्यातून बरे होत असताना रुग्णांनी पुढील काही लक्षणांवर नजर ठेवून असणे आवश्यक आहे. तसेच थायरॉईडची पातळी वरखाली होणे हीसुद्धा कोविडचे निदान करण्यासाठी एक खुणेची गोष्ट ठरू शकते आणि म्हणूनच फिजिशियन्सनी या नव्याने उद्भवलेल्या चिकित्सात्मक घडामोडींच्या शक्यतेबद्दल सजग असायला हवे.

 सबऍक्यूट थायरॉइडायटिसचे सर्वात ठळक वैशिष्टय़ म्हणजे – थायरॉईड ग्रंथींमध्ये हळूहळू किंवा अचानक जाणवणारी वेदना. थायरॉईड ग्रंथींना येणारी वेदनादायक सूज अनेक आठवडे किंवा महिने तशीच राहू शकते. थायरॉईड ग्रंथींमधील स्राव अतिरिक्त प्रमाणात स्रवत असल्याची (हायपरथायरॉइडिझम) लक्षणे, उदा. चिंताग्रस्तता, हृदयाचे ठोके जलदगतीने पडणे आणि उष्णता सहन न होणे ही या आजाराची सुरुवातीची लक्षणे आहेत. नंतर थायरॉईड ग्रंथीमधील स्राव अतिशय कमी प्रमाणात स्रवत असल्याची (हायपोथायरॉइडिझम) थकवा, बद्धकोष्ठता किंवा गारवा सहन न होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येऊ लागतात. काही काळाने या ग्रंथींचे कार्य पूर्ववत होते, पण तरीही ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी.

अशा अनेक संभाव्य परिघीय आणि केंद्रीय यंत्रणा आहेत, ज्यांच्या माध्यमातून कोविड-19 चा संसर्ग सबऍक्यूट थायरॉइडायटिससाठी कारणीभूत ठरू शकतो हे बहुतांश वेळा नजीकच्या काळात श्वसनमार्गाला विषाणू संसर्ग झाल्याच्या लक्षणांना सामोऱया गेलेल्या मध्यमवयीन महिलांच्या बाबतीत घडते. हा स्वतःहूनच आटोक्यात येणारा आजार असून त्याचे तीन विशिष्ट टप्पे आहेत – सुरुवातीच्या थायरोटॉक्सिक टप्प्यानंतर हायपोथायरॉइडिझमची स्थिती उद्भवते व त्यानंतर पुढील काही आठवडे ते काही महिन्यांपर्यंतच्या काळामध्ये थायरॉईड ग्रंथींचे कार्य पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरू राहते.

मात्र यातील चांगली गोष्ट म्हणजे वेळच्या वेळी निदान झाल्यास कोविड-19 मुळे उद्भवलेला सबऍक्यूट थायरॉइडायटिस दाहशामक औषधे आणि कोर्टिकोस्टेरॉईड उपचारांना चांगला प्रतिसाद देतो. असे असले तरीही इथे एक गोष्ट आवर्जून नोंदवायला हवी ती म्हणजे कोविड रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स किंवा अशा रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींनी लवकरात लवकर या गोष्टीची नोंद केली पाहिजे. लवकरात लवकर झालेले निदान आणि वेळच्या वेळी घेतलेला दाहशामक औषधोपचार यांच्या आधारे या आजाराचे यशस्वी व्यवस्थापन शक्य आहे.

(लेखिका फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथे कन्सल्टन्ट एंडोक्रिनोलॉजिस्ट व डायबेटोलॉजिस्ट आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या