वारसावैभव – अभिमानास्पद बहुमानाची मोहोर

>> डॉ. वि. ल. धारुरकर

युनेस्कोच्या 47 व्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात महाराष्ट्र व तामीळनाडूमधील 12 ऐतिहासिक मराठा किल्ल्यांना ‘जागतिक वारसा स्थळ’ असा बहुमान मिळाला आहे. या किल्ल्यांना ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे. या यशामुळे भारतातील जागतिक वारसा स्थळांची संख्या 44 वर पोहोचली असून भारत जगभरात सहाव्या क्रमांकावर आहे. गडकोटांना सन्मान मिळाला एवढय़ावर समाधान न मानता स्वराज्याचे नागरिक म्हणून तमाम मराठी जनांनी गडकोटांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या प्रचार-प्रसारासाठी आपले योगदान दिले पाहिजे.

जगभरातील वैशिष्टय़पूर्ण अशा वारसा स्थळांना ‘युनेस्को’च्या वतीने जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केले जाते. अशी वारसा स्थळे भारतामध्ये 44 असून जगामध्ये त्यांची संख्या 1223 इतकी आहे. 1980 च्या दशकात भारतीय पुरातत्व खात्याच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील अंजिठा, वेरुळ यांसारख्या जगद्विख्यात लेणींचा जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यात आला. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अजिंक्य अशा 12 गडांना जागतिक वारसा स्थळे म्हणून ओळख मिळाली आहे. या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोणावळा येथील लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यांचा तसेच तामीळनाडूमधील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. ही बाब महाराष्ट्राच्या समृद्ध, सांस्कृतिक वारसा अधिक सुसंपन्न करणारी आहे. त्याही पलीकडे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रामध्ये नवीन क्रांती घडवून आणणारी आहे. जागतिक वारसा म्हणून महाराष्ट्रातील गडकोटांची नोंद झाल्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनाचा परतावा गतीने वाढणार आहे. देशी आणि विदेशी पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात नव्या रोजगार संधीची उपलब्धी होणार आहे.

मागील काही वर्षांतील स्थिती पाहिल्यास नव्या जगातून आणि युरोपातून भारताकडे येणारे पर्यटक हे प्रामुख्याने दिल्ली, आग्रा, जयपूर या गोल्डन ट्रँगलमध्येच अडकलेले दिसत. देशात येणाऱया विदेशी पर्यटकांपैकी 5 ते 7 टक्के पर्यटक फक्त अंजिठा किंवा वेरुळ पाहण्यासाठी दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीत येतात. तशाच प्रकारे महाराष्ट्राच्या गडकोटाकडेही पर्यटकांचे दुर्लक्ष होते.

व्हिएतनामचे मुक्तीदाता स्वातंत्र्ययोद्धे होचीमीन यांनी भारतात आल्यानंतर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड पाहावयाचा आहे अशी विनंती केली होती, तेव्हा त्यांच्यासाठी स्वतंत्र विमानाने रायगड पाहण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली. तेथील मूठभर माती घेऊन ते आपल्या देशात गेले आणि त्यांनी आपल्या देशातील लोकांना गनिमी युद्ध लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली, असे अभिमानाने सांगितले.

छत्रपती शिवाजीराजे हे युगपुरुष होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारलेले स्वराज्य स्थापन करणाऱया छत्रपतींचे 300 हून अधिक किल्ल्यांपैकी 200 किल्ले स्वतः महाराजांनी उभारलेले आहेत. पेशवाई पडल्यानंतर इंग्रजांनी सत्ता हातात घेताना या गडकोटांना आगी लावून भेसूर करून टाकले. त्यानंतर महाराष्ट्रातील गडकोटांच्या संरक्षण, संवर्धन या कामाकडे दुर्लक्ष झाले. गेल्या काही वर्षांत पुन्हा एकदा गड संवर्धनाच्या प्रक्रियेला चालना दिली जाऊ लागली; पण तरीदेखील पुरातत्व खात्याकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन आणि अपुरी वित्तीय तरतूद ही कायम राहिली. या पार्श्वभूमीवर शिवकाळातील 12 गडकोटांचा विश्व वारसा स्थळांमध्ये समावेश होणे ही बाब स्वागतार्ह आणि स्पृहणीय म्हणावी लागेल.

या गडकोटांच्या व्यवस्थापनाचा, त्यांच्या नियोजनाचा, त्यातील पद्धशीर नियंत्रण, संतुलन आणि व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास केला असता असे दिसते की, मध्ययुगीन काळातही अत्यंत प्रगत अशी संरक्षण व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवकालामध्ये विकसित केली होती. त्यामुळे मध्य आशियातून भारतावर चालून आलेल्या मुघलांना परास्त करून हिंदवी स्वराज्याची ध्वजा गगनामध्ये उंच उंच फडकवण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले. महाराष्ट्रातील गडकोटांच्या वैभवांचा इतिहास विदेशी पर्यटक, अभ्यासक, संशोधक यांच्यासमोर आणण्यासाठी काही गोष्टी प्राधान्याने करावयास हव्यात.

पहिले म्हणजे, गडकोटांच्या सुरक्षा आणि वैभवाच्या सुवर्णकडा पुन्हा प्रकाशमान होण्यासाठी त्यांच्या संवर्धनावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल. मुख्य शहरापासून गडकोटापर्यंत उत्तम दर्जाच्या रस्त्यांचे जाळे तयार करावे लागेल. रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक आणि रस्ते वाहतूक यामध्ये ज्या समन्वयाची गरज असते, तशा समन्वयाची व्यवस्था महाराष्ट्रात नसल्यामुळे रायगडावर पोहोचणे किंवा प्रतापगडावर पोहोचणे, शिवनेरीवर पोहोचणे राजगडावर पोहोचणे या बाबी म्हणजे पर्यटकांना साहस वाटू लागतात. खरे तर या सर्व गडकोटांना एकमेकांशी जोडून त्यांचे पर्यटन शास्त्राप्रमाणे सर्किट तयार केल्यास तेथे पोहोचण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गडकोटांचे पावित्र्य राखण्यासाठी, तेथील जिवंत इतिहास बोलका करण्यासाठी कल्चलर लुकआऊट नोटिस म्हणजे सांस्कृतिक इतिहासाचे पट लोकभाषेमध्ये उलगडले पाहिजेत. इंग्रजी तसेच मराठी भाषेमध्ये या गडकोटांचा थोडक्यात आणि प्रभावी असा इतिहास प्रकट केला पाहिजे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गडकोटांच्या सांस्कृतिक इतिहासातील मर्मभेदक अशा अंतःप्रवाहाचे नव्याने आकलन करणे. उदाहरणार्थ, राजगडावरील बालेकिल्ल्याचे काय वैशिष्टय़ आहे, पन्हाळ गडावरील अत्यंत महत्त्वाच्या अशा युद्धक्षेत्राचे काय वैशिष्टय़ आहे, प्रतापगडावरील युद्धक्षेत्राचे स्थान कोणते आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने पन्हाळगड ओलांडून विशाळगडाकडे कूच केली या सर्व रोमहर्षक प्रसंगाचे अलीकडे चित्रपटातून प्रकटीकरण होत आहे. परंतु वॉर टुरिझम किंवा युद्ध पर्यटन यादृष्टीने विचार करता 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला तोरणा, 1795 मध्ये मराठय़ांनी निजामाला धूळ चारत जिंकलेली खडर्य़ाची लढाई यांसारख्या थरारक कथा तितक्याच समर्पकपणाने इंग्रजी भाषेतून जागतिक स्तरावर प्रसारित व्हायला हव्यात. 1646 पासून 1795 पर्यंत मराठय़ांनी केलेली पराक्रमांची शर्थ पाहता असे दिसते की मराठय़ांनी गडकोटांच्या रक्षणातून, संरक्षणातून एक जबरदस्त शक्ती मध्ययुगीन भारतामध्ये निर्माण केली होती. बी. एन. आपटे यांच्या ‘मराठा नाव्हल पॉवर’ या ग्रंथामध्ये त्यांनी मराठय़ांनी चंद्रगुप्त मौर्यानंतर कशा पद्धतीने आरमार सज्ज केले होते यांचे अत्यंत समर्पक वर्णन आलेले आहे. युद्धनौकांची उभारणी, त्यांची प्रगत रचना त्यांचा पोर्तुगीजांविरुद्ध मराठय़ांनी केलेला उपयोग पाहता मराठय़ांचे नौदल किती सामर्थ्यवान होते यांची प्रचीती येते.

तात्पर्य असे की, शिवाजीराजांनी उभे केलेले गडकोट ही महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाचे खंदे साक्षीदार आहेत. आज परदेशांमध्ये जाऊन तेथील टोलेजंग इमारतींच्या स्थापत्यकलेचे गोडवे गाताना आपल्या मायभूमीमध्ये उभारण्यात आलेल्या शिवकालीन गडकिल्ल्यांचा विसर पडता कामा नये. उलटपक्षी जगभरातील भ्रमंतीतून या गडकिल्ल्यांच्या अभुतपूर्व स्थापत्यकलेची माहिती आपण प्रसृत केली पाहिजे. शासनाने जागतिक वारशांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव पाठवून एक मोठे पाऊल टाकले आहे. पण तेवढय़ावर समाधान न मानता स्वराज्याचे नागरिक म्हणून तमाम मराठी जनांनी गडकोटांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या प्रचार-प्रसारासाठी आपले योगदान दिले पाहिजे.
(लेखक ज्येष्ठ विचारवंत आहेत.)