
अयोध्येचा राजा, माणूस, कुंपू, झनक झनक पायल बाजे, दो आँखे बारा हाथ, नवरंग, पिंजरा यांसारखे अजरामर चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांचे 125वे जयंती वर्ष 18 नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. यानिमित्त कोल्हापूर, पुणे आणि मुंबई शहरांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जानेवारीमध्ये मुंबई व ठाणे येथे होणाऱ्या आशियाई चित्रपट महोत्सवात डॉ. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचा विशेष विभाग असणार आहे. तसेच प्रभात चित्र मंडळ आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया या संस्थांच्यावतीने व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचे विशेष शो होतील. तसेच या 125व्या जयंती वर्षानिमित्त गोव्यात आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘डॉक्टर कोटनीस की अमर कहानी’ हा चित्रपट दाखवण्यात येईल. महोत्सवाच्या सांगता समारंभात व्ही. शांताराम यांच्यावरील पोस्ट स्टॅम्पचे अनावरण करण्यात येईल.































































