नालेसफाईचे काम 90 टक्के फत्ते; शहर, पश्चिम उपनगरात काम अंतिम टप्प्यात

521

कोरोनाविरोधात पालिकेची संपूर्ण यंत्रणा जुंपलेली असताना पावसाळापूर्व कामेही पूर्ण होत आली आहेत. यामध्ये नालेसफाईचे ९० टक्के काम फत्ते झाले असून शहर आणि पश्चिम उपनगरात काम अंतिम टप्प्यात आहे. तर पूर्व उपनगरातील काम पूर्ण झाले आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती दिली.

एकीकडे मुंबईत कोरोनाचा प्रभाव वाढत असताना मुंबईत पावसाळापूर्व कामे कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पालिकेने मुंबईकरांच्या हितासाठी सर्व पावसाळीपूर्व कामे वेगाने केली असून काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. स्थायी समितीच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामांचे सगळे प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करण्यात आले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हेदेखील पालिका अधिकार्‍यांसोबत नालेसफाई, रस्ते कामांची वेळोवेळी पाहणी करून आढावा घेत आहेत. मुंबईतील एकूण नालेसफाईच्या ७० टक्के नालेसफाई पावसाळ्याआधी केली जाते. यातील ९० टक्के काम पूर्ण झाल्याने शिल्लक दिवसांत आणि पावसाळ्यापूर्वी सर्व काम पूर्ण हाईल असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

२६३.९१ किमी लांबीचे नाले,२ लाख २६ हजार मेट्रिक टनांवर गाळ
– मुंबई शहरात २१.९७ किमीचे मोठे नाले आहेत. यातून दरवर्षी पावसाळ्याआधी २५ हजार ४९८ मेट्रिक टन गाळ काढला जातो. २९ मेपर्यंत यातील १९ हजार ३५६ म्हणजेच ७७ टक्के गाळ काढण्यात आला आहे.
– पूर्व उपनगरात १०२.१ किमी लांबीचे मोठे नाले आहेत. यातील ८५ हजार ४३८ मेट्रिक टन गाळ पावसाळ्याआधी काढावा लागतो. आतापर्यंत यातील ८७ हजार ०८५ मेट्रिक टन म्हणजेच १०१ टक्के गाळ काढण्यात आला आहे.
– पश्चिम उपनगरात असणार्‍या १३९.८४ किमीच्या मोठ्या नाल्यांमधून १ लाख ४२ हजार ३७९ मेट्रिक टन गाळ काढावा लागतो. आतापर्यंत यातील १ लाख १९ हजार ७१२ मेट्रिक टन म्हणजेच ८४ टक्के गाळ काढण्यात आला आहे.

मिठी नदीही गाळमुक्त
मुंबईला पुराचा धोका असणार्‍या मिठी नदीमधील अतिक्रमणे हटवणे आणि गाळ काढण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. यामध्ये २१.५० किमीच्या मिठी नदीतून पावसाळ्याआधी ९८ हजार ५७८ मेट्रिक टन गाळ काढावा लागतो. यातील आतापर्यंत ८१ हजार ८९७ टक्के म्हणजेच ८३ टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या