
मुंबई विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत परकीय चलन आणि हिरे तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी हवाला ऑपरेटर आणि हॅण्डलरसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. आरोपींकडून तीन कोटी रुपयांचे डॉलर, पाऊंड आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचला होता. यादरम्यान परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयित प्रवाशांना ताब्यात घेत त्यांच्या सामानाची झडती घेतली. झडतीदरम्यान, संशयित प्रवाशांच्या हँडबॅगमध्ये परकीय चलन आणि हिरे सापडले. संशयितांनी अत्यंत चलाखीने हे लपवले होते.
डीआरआयने परकीय चलन आणि हिरे ताब्यात घेत आरोपींना अटक केली. जप्त केलेल्या मुद्देमालात 1.93 कोटी रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर्स आणि ब्रिटीश पाउंड्स तसेच 1.10 कोटी रुपये किमतीच्या हिऱ्यांचा समावेश आहे. तपास पथकाने या सिंडिकेटमागील सूत्रधारासह परदेशी चलन पुरवणाऱ्या हवाला ऑपरेटर आणि हँडलरलाही बेड्या ठोकल्या आहेत. सहाही आरोपींवर सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























































