सावधान; पेपर कपमध्ये पिता चहा? होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकदा वापरण्यायोग्य कागदापासून बनविलेल्या कपमध्ये तुम्ही चहा पित असाल तर, सावधान! तुमची ही चूक तुमच्या आरोग्यसाठी हानिकारक ठरू शकते. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जर एखादी व्यक्ती पेपर कपमध्ये दिवसातून तीन वेळा चहा पित असेल तर, त्याच्या शहरीरात प्लास्टिकचे 75,000 सूक्ष्म कण जातात. हे आपल्या शरीरासाठी खूप घातक ठरू शकते.

कप बनवण्यासाठी हायड्रोफोबिक फिल्म वापरली जाते

आयआयटी खडगपूरने पेपर कपमध्ये चहा पिण्यावर अभ्यास केला आहे, ज्यामध्ये याचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल सांगण्यात आले आहे. आयआयटी खडगपूर येथील सहायक प्राध्यापिका सुधा गोयल यांनी सांगितले की, ‘एकदा वापरण्यायोग्य पेपर कपमध्ये कोणतेही पेय पिणे सामान्य गोष्ट झाली आहे.’

त्यांनी सांगितलं, ‘आम्ही करत असलेल्या संशोधनात असे दिसून आले की, या कपांमधील प्लास्टिक आणि इतर हानिकारक घटकांमुळे गरम द्रव पदार्थ दूषित होतात. हे कप तयार करण्यासाठी हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर बसविला जातो, जो प्रामुख्याने प्लास्टिकचा बनलेला असतो. याच्या मदतीने कपमधील द्रव पदार्थ टिकून राहते. यात गरम पाणी टाकल्यानंतर 15 मिनिटांत हा थर वितळण्यास सुरवात होते.’

गोयल यांनी पुढे सांगितलं, आमच्या आमच्या संशोधनानुसार एका कपमध्ये 15 मिनिटांसाठी 100 मि.ली. गरम द्रव ठेवल्यास त्यात 25,000 सूक्ष्म-आकाराचे प्लास्टिकचे कण वितळवते. म्हणजेच दररोज तीन कप चहा किंवा कॉफी पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्लास्टिकचे 75,000 सूक्ष्म कण जातात. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असं त्या म्हणल्या आहेत.