
मुंबई, महाराष्ट्रात ड्रोनहल्ला होण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण ड्रोनहल्ल्याचा विचार केला जात असल्याचे संभाषण सायबर पोलिसांच्या हाती लागले आहे. यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. डार्क नेटचा वापर करून दहशतवादी यासंदर्भात एकमेकांशी संभाषण करत असल्याचे सुरक्षायंत्रणेच्या निदर्शनास आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. ड्रोनहल्ला होण्याचा धोका असल्याने तो परतवून लावण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज होत आहेत. तसेच अन्य सुरक्षायंत्रणांनादेखील सतर्क करण्यात आले आहे. लवकरच पोलिसांकडे ड्रोनहल्लाविरोधी यंत्रणा दाखल होणार आहेत. सायबरहल्ला झाला तरी तो परतवून लावू शकतो, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. मुंबई पोलिसांकडून परवानगीशिवाय ड्रोनचा वापर कोणालाही करू दिला जात नाही. गेल्या आठवडय़ात धारावीच्या शाहूनगर येथे एकाने विनापरवानगी ड्रोन उडवला असता त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.