सौदी अरबमधील मोठ्या तेल कंपनीवर येमेनच्या बंडखोरांचा ड्रोन हल्ला

785

सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या दोन तेल संयंत्रांवर शनिवारी ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी चार वाजण्याच्या सुमारास हल्ला झाल्याची माहिती सौदीच्या प्रसारमाध्यमांनी गृह मंत्रालयाच्या हवाल्याने दिली आहे. अबकैक आणि खुराइसमधील या संयंत्रांवर झालेल्या हल्ल्यानंतर कंपनीत आगीने रौद्र रुप धारण केले असून आरामकोच्या सुरक्षा दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संयंत्रांना लागलेली आग नियंत्रणात आली असून इतर ठिकाणी पसरलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येमेनच्या इराणसमर्थक बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

या हल्ल्यानंतर पूर्व प्रांतात तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, अद्याप ड्रोनच्या स्रोतांबाबत माहिती मिळालेली नाही. मागच्या महिन्यात येमेनच्या इराणसमसर्थक हुती बंडखोरांनी अरामकोच्या शायबा नैसर्गिक वायू द्रवीकरण केंद्राला आग लावली होती. त्यात जिवीतहानी झाली नव्हती. गेल्या काही महिन्यांपासून हुती बंडखोरांनी सौदीतील हवाई क्षेत्र आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करत मिसाइल आणि ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रात सौदीकडून करण्यात येणाऱ्या कारवाईच्या विरोधात हे हल्ले करण्यात येत आहेत.

अरामको ही सौदी अरेबियातील सर्वात मोठी आणि श्रीमंत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे बंडखोर आणि दहशतवाद्यांकडून या कंपनीला लक्ष्य करण्यात येते. याआधाही 2006 मध्ये अल कायदाच्या आत्मघातकी दहशतवाद्यांनी कंपनीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरक्षा दलाने तो हाणून पाडला होता. शनिवारी पुन्हा ड्रोनद्वारे कंपनीला लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी इराणसमर्थक हुती बंडखोरांनी घेतली आहे. अल मसीरा टीव्हीवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. बंडखोरांनी 10 ड्रोनद्वारे हा हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यानंतर कंपनीतून आगीचे लोट निघत होते. या आगीत झालेल्या जिवीत आणि वित्तहानीबाबतची माहिती मिळालेली नाही. या हल्ल्यानंतर सौदीतील अतंर्गत तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या