
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
अस्मानी संकटामुळे अनेक वर्षांपासून झुरणाऱ्या मराठवाड्याला यंदाच्या दुष्काळाने ‘पडीक’ केले आहे. तब्बल साडेचार लाख हेक्टरमध्ये पेरणीच झाली नसल्याने बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यापेक्षाही गंभीर परिस्थिती पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची आहे. तब्बल ५० लाख हेक्टरवरील उभी पिके जळाली असल्याने उत्पन्नासह त्यांच्या पेरणीचाही खर्च वाया गेला आहे. एकूणच या दुष्काळाने शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न बुडणार असल्याने त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. केंद्र सरकार भलेही शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करणार असले तरी यातून या हजारो कोटींची भरपाई होणार का, हा खरा प्रश्न आहे.
सरकारने परिस्थितीचे गांभीर्य पाहून केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे ३१ ऑक्टोबर रोजी दुष्काळ जाहीर केला. यावेळी दुष्काळाच्या झळा किती गंभीर आहे. हे दिसून आले होते. मात्र आता १५ डिसेंबर रोजी महसूल विभागाने अंतिम पैसेवारी जाहीर केल्यानंतर दुष्काळाचे भीषण वास्तव समोर आले आहे. आठ जिल्ह्यांतील ८ हजार ५३३ गावांतील ५५ लाख ४४ हजार १३६ हेक्टरपैकी या दुष्काळी परिस्थितीने ५० लाख ७२ हजार ९२१ हेक्टरमध्येच पेरणी होऊ शकली. तर ४ लाख ५१ हजार २६४ हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. यंदा सरासरीइतका पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यंदा जोमाने मशागतीला प्रारंभ केला. कर्ज काढून बियाणे खरेदी केले. एक दोन पावसानंतर कष्टाने पेरणी केली, मात्र पावसाने पुन्हा दगा दिल्याने ५० लाख ७२ हजार ९२१ हेक्टरमधील पिके उद्ध्वस्त झाली. बघता बघता हे क्षेत्र ओसाड झाले. ऐन पेरणीच्या काळातच पाऊस गायब झाल्याने ४ लाख ५१ हजार २६४ हेक्टरमध्ये पेरणी झालीच नाही. तब्बल ५५ लाख ४४ हजार १३६ हेक्टर जमिनीचे वाळवंट झाले.
दुष्काळ जाहीर होताच सरकारने दुष्काळ निवारणार्थ कामे सुरू केली. जनावरांना चारा-पाणी तर गावागावांत पिण्याचे पाणी तसेच रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी दुष्काळाने ५५ लाख हेक्टर क्षेत्रातील झालेले पिकांच्या नुकसान भरून कसे निघणार हा खरा प्रश्न आहे. हे क्षेत्र ओसाड झाल्याने नेमके शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले, याचा हिशोब लावण्यासाठी महसूल किंवा कृषी विभागाकडे कुठलीही यंत्रणा नाही. त्यामुळे हे नुकसान नेमके किती झाले याची आकडेवारी समोर येऊ शकत नाही. असे असले तरी बळीराजाचे हजारो कोटींचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण प्रत्येक वर्षी कमी होत आहे. त्यामुळे ५ वर्षांपासून शेतकरी त्रस्त आहेत. पेरणी आणि मशागतीसाठी झालेला खर्चही या उत्पादनातून मिळत नसल्याने मराठवाड्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदा तर अख्ख्या मराठवाड्याला दुष्काळाने विळखा घातला असल्याने शेतकऱ्यांना कवडीचे उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे परिस्थिती गंभीर होणार आहे. दुष्काळ निवारणार्थ सुरू असलेल्या कामामुळे शेतकरी तग धरू शकणार असला तरी या दुष्काळाने झालेले नुकसान भरून न निघणारे आहे. अशा परिस्थितीत आता सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार याकडे लक्ष लागले आहे. केंद्र सरकारने पाठविलेल्या पथकाने दुष्काळी भागाची केलेली पाहणी औपचारिक ठरली असल्याने सरकारकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत औपचारिक ठरणार की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पाच वर्षांपासून पीक उत्पादकतेमध्ये ५० टक्के घट
पावसाने मोठा दगा दिल्याने खरिपातील पीक उद्ध्वस्त झाले आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, मका, मूग उडिद, सोयाबीन, कापूस व तूर ही पिके घेतली जातात. या पिकांपैकी आतापर्यंत कापूस व तूर पीक वगळता इतर सर्व पिकांचे कृषी विभागाने कापणी प्रयोग केले. त्यानुसार पाच वर्षांपासून पिकांच्या उत्पादकतेमध्ये ५० टक्के घट आली असल्याचे समोर आले आहे. एकूण सरासरीनुसार प्रतिहेक्टर पिकांच्या उत्पादकतेची सरासरी पाहता ज्वारी ९७८ पैकी ४०९ किलो, बाजरी-७५३ पैकी ४२६ किलो, मका २ हजार १२७ पैकी १ हजार १४६ किलो, मूग ५०३ पैकी १८६, उडिद ५७६ पैकी २१४ सोयाबीन ७६४ पैकी ५८५ अशी उत्पादकता आली आहे. ५ वर्षांपासून पिके उद्ध्वस्त करणाऱ्या या दुष्काळाने यंदा शेतकऱ्यांनाच् उद्ध्वस्त केले आहे.































































