मुस्तफा कुब्बावाला अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात, दुबईत बसून हिंदुस्थानात ड्रग्जचा धंदा

दुबईत राहून आपल्या हस्तकांमार्फत हिंदुस्थानात ड्रग्जचा धंदा करणारा मुस्तफा कुब्बावाला अखेर लटकला. मुंबई गुन्हे शाखेने बजावलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे अचूक माग काढत कुब्बावाला याला दुबईतून उचलून आणला. या कारवाईमुळे हिंदुस्थानातील ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडण्यास मदत होणार आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट-7 ने फेब्रुवारी 2024 मध्ये ड्रग्जची खरेदी विक्री करणाऱ्या दोघा तस्करांसह सुरत येथील दोघा ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळल्या होत्या. मग मार्च महिन्यात सांगली जिह्यातील इरळी गावात थाटलेला एमडीचा कारखाना वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे व त्यांच्या पथकाने उद्ध्वस्त केला होता. त्यावेळी दुबईत बसून दोघेजण महाराष्ट्र व गुजरातमध्ये ड्रग्स बनवून त्याची खरेदी-विक्री आपल्या हस्तकांमार्फत करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून गुन्हे शाखा दुबईत राहणाऱ्या त्या दोघांना पकडण्यासाठी प्रयत्नशील होते.

कच्चा मालाचा पुरवठा व गुजरातमध्ये विक्री

कुब्बावाला आणि डोसा हे दुबईत राहून हिंदुस्थानात ड्रग्जचा धंदा करायचे. आपल्या हस्तकांना ते कच्चा माल उपलब्ध करून देऊन एमडी बनवून घ्यायचे. मग तयार झालेला एमडी सुरत, अहमदाबादसह इतरत्र विकायचे. शिवाय यातून मिळणारा पैसा ते हवालामार्फत दुबईत घ्यायचे. मूळचा सुरतच्या असलेला कुब्बावाला महाराष्ट्रासह विविध ठिकाणी ड्रग्जचा धंदा करत होता.