भोपाळमधील 1800 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपीने पोलीस ठाण्यात दाखल होताच स्वतःवर गोळी झाडून घेतली. यात आरोपी जखमी झाला. पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. प्रेमसुख पाटीदार असे आरोपीचे नाव आहे.
गुजरात एटीएस आणि ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ (एनसीबी)ने 5 ऑक्टोबरला मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून 1800 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. कारवाईवेळी हरीश अंजुना नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्याने पाटीदारचे नाव घेतले होते. त्यानुसार पोलीस त्याच्या मागावर होते.
एनसीबीच्या तपासादरम्यान हरीश अंजुनाने ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे साहित्य महाराष्ट्रातून तर केमिकल गुजरातच्या वलसाडमधून आणल्याची कबुली दिली होती. त्याने पाटीदारच्या नावाचा उल्लेख केला होता. पाटीदारबरोबर तो ड्रग्जचा व्यापार करत असून तो मुख्य सप्लायर असल्याचे हरीश अंजुनाने जबानीत म्हटले होते.