स्ट्रगलिंग अॅक्टरना ड्रग्ज विकणारा पोलिसांच्या जाळ्यात

सामना प्रतिनिधी । मुंबई

गिरगावात बडय़ा ड्रग्ज सप्लायरच्या मुसक्या आवळल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी दुसरी मोठी कारवाई केली. पश्चिम उपनगरात राहणाऱ्या स्ट्रगलिंग अॅक्टर तसेच उच्चभ्रू तरुणांना एमडीची विक्री करणारा मोठा ड्रग्ज सप्लायर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्याकडून चार लाख रुपये किमतीचा 100 ग्रॅम एमडीचा साठा जप्त केला.

जोगेश्वरीच्या राजनगर सोसायटीत राहणारा अदिल जैनुलादिन नाकवा (28) हा ड्रग्ज पेडलर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील पवई प्लाझा येथे येणार असल्याची खबर घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक शेळके यांना मिळाली. त्यानुसार शेळके व त्यांच्या पथकाने बुधवारी त्या ठिकाणी सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार नाकवा तेथे येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 100 ग्रॅम एमडी सापडला. लोखंडवालासारख्या उच्चभ्रू वस्तीत राहणारे उदयोन्मुख कलाकार तसेच तरुण-तरुणीना नाकवा एमडीची विक्री करायचा. ड्रग्ज सप्लायर करणाऱयांमध्ये नाकवाचे नाव असून त्याला झालेली अटक ड्रग्ज पेडलर्सना मोठा धक्का असल्याचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी आझाद मैदान युनिटने गिरगावात एमडीएमए या महागडय़ा ड्रग्जची विक्री करणाऱया सप्लायरला पकडले होते.