पाच विमानतळांवरून परदेशात ड्रग्जचा सप्लाय

706

उच्च प्रतीच्या चरसचा साठा हिंदुस्थानातील पाच विमानतळांवरून परदेशात पाठविणार्‍या आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियांच्या दोघा म्होरक्यांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने चरसच्या साठ्यासह रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून पाच लाख 60 हजार रुपये किमतीचा चरस जप्त करण्यात आला. ड्रग्जच्या तस्करीतून रग्गड पैसा कमावणारे हे दोघे पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्जची तस्करी करणार्‍या टोळीचे दोन प्रमुख माफिया मुंबईत असल्याची वांद्रे युनिटला खबर मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे, एपीआय सुशांत बंडगर, विशाल खैरे, उपनिरीक्षक शंकर पवळे आदींच्या पथकाने यासीन अब्दुल (32) आणि बादशहा पल्लीकल अब्दुल अबदूस सदम (29) या दोघांना पकडले. त्यांनी कर्नाक बंदर परिसरात आणून ठेवलेला एक किलो 400 ग्रॅम वजनाचा चरसचा साठा जप्त केला. हा चरस ते कतारला पाठविण्याच्या तयारी होते. हे दोघे तस्कर मूळचे केरळचे असून ते मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, कोचीन, मंगळुरू या विमानतळांवरून पॅसेंजरच्या बॅगा किंवा सामानातून चरसचा साठा कतार तसेच अन्य देशात पाठवतात, असे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.

दोहात सहा महिन्यांमध्ये  96 जणांना पकडले

अटक आरोपींचे देशभरात मोठे जाळे आहे. अशाप्रकारे प्रवाशांच्या माध्यमातून ते चरस परदेशात पाठवतात. गेल्या सहा महिन्यात अशा पद्धतीने ड्रग्ज घेऊन गेलेल्या 96 जणांना दोहा विमानतळावर पकडण्यात आले. मुळात त्यांना आपण ड्रग्ज नेत असल्याचे ठाऊक नव्हते, पण ते बळीचा बकरा बनले.

नवविवाहित जोडपे, बेरोजगारांचा वापर

जी नवविवाहित जोडपी हनिमूनसाठी आखाती देशात जाण्यासाठी तयार असतात अशांना ते हेरतात. त्यांना कमी किंमतीत हनिमून पॅकेज मिळवून देतात. फक्त त्या ठिकाणी जाताना आमचे एक घरचे सामान तिकडे घेऊन जा आणि विमानतळावर आमचा माणूस भेटेल त्याच्याकडे द्या असे त्या जोडप्याला सांगून ड्रग्जची तस्करी करतात.

नवविवाहित जोडप्यांव्यतिरिक्त प्लंबिंग किंवा अशाप्रकारचे काम करणारे आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनादेखील गळाला लावायचे. कतारला कामगारांची गरज आहे, पण आधी तेथे एका हॉटेलात जाऊन मुलाखत देऊन या. सिलेक्ट झालात तर नोकरी पक्की असे आमिष दाखवून पासपोर्ट, व्हिसा आरोपी त्यांना बनवून द्यायचे. मग त्यांच्यासोबत आमचे सामान घेऊन जा अशी बतावणी करीत ड्रग्ज पाठवून द्यायचे.

आपली प्रतिक्रिया द्या