
महापालिका निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर पैशाचे वाटप सुरू असल्याचा संशय आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मोठय़ा प्रमाणावर तपासणी सुरू केली आहे. त्यात आतापर्यंत 8 कोटी 28 लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली आहे, तर निवडणूक आचारसंहितेच्या काळात तब्बल 75 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
निवडणूक आचारसंहितेच्या काळात मोठय़ा प्रमाणावर तपासणी सुरू आहे. वाहनांची तपासणीही सुरू आहे. आचारसंहितेच्या काळात 50 हजार रुपयांची रोकड बाळगण्याची मुभा आहे. त्यापेक्षा अधिक रक्कम सापडल्यास चौकशी होते. महापालिका निवडणूक आचारसंहितेच्या दरम्यान आतापर्यंत 8 कोटी 28 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय चार कोटी रुपये किमतीचे मद्य, 75 कोटी 68 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ तसेच 900 च्या आसपास घातक शस्त्रs जप्त करण्यात आली. त्यामध्ये पिस्तुल, काडतुसे, तलवारी, कोयते, खंजीर, चाकू अशा शस्त्रांचा समावेश आहे. या काळात आचारसंहिता भंगाच्या 341 तक्रारी प्राप्त झाल्या असून यापैकी 280 तक्रारी निकाली काढल्या आहेत.





























































