दारू पिल्यानंतर झाला वाद, मित्रानेच केला खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

दारू पिल्यानंतर दोघा मित्रांमध्ये झालेल्या वादातून मित्राने खून केला आहे. त्यानंतर  आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होउन खुनाची कबुली दिली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गरवारे शाळेतील दुसऱ्य़ा मजल्यावर घडली.

राजन रमेश सहानी (वय 27, रा. वारजे नाका) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी  किसन प्रकाश वरपा (वय 21, रा. श्रमिक वसाहत, वारजेनाका) याला अटक केली आहे.

राजन आणि किसन एकमेकांचे मित्र असून त्यांना दारु पिण्याचे व्यसन होते. राजनच्या वडिलांचे रंगविक्रीचे दुकान असून आरोपी किसन यांच्या भावाचे मेडीकल आहे. दोघेही मित्र काहीही कामधंदा करीत नव्हते. रविवारी दुपारी ते दारु पिण्यासाठी अड्ड्यावर गेले होते. त्यानंतर रात्री उशीर झाल्याने आरोपी किसन राजनला घेऊन गरवारे शाळेत गेला. लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने दारू पिल्यानंतर किसन नेहमी शाळेच्या कंपाऊंडवरुन उडी मारुन व्हरांड्यात झोपत होता. त्याप्रमाणे रविवारी रात्री दोघेही कंपाऊंडवरुन उडी मारुन आत गेले.  दुसऱ्य़ा मजल्यावरील व्हरांड्यात बसून त्यांनी पुन्हा  दारु प्राशन केली.

जास्त दारू प्यायल्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली. त्याचा राग आल्यामुळे राजनने किसनच्या हातावर  फावडे मारले. त्यामुळे जखमी झाल्याचा राग आल्यामुळे किसनने भिंतीवरील फायर सेफ्टीचे यंत्र काढून राजनच्या डोक्यात मारले. जबरी घाव बसल्याने राजन जागेवरच कोसळला. त्यानंतर किसनने त्याला ओढत नेउन पुन्हा दोन तीन वेळा मारहाण करून घरी निघून आला. राजन परत घरी न आल्याने त्याच्या कुटूंबियांनी शोधाशोध सुरु केली. त्यानंतर राजन बेपत्ता असल्याची तक्रार मंगळवारी वारजे पोलिसांकडे केली. त्यानंतर बुधवारी आरोपीने स्वतः गुन्ह्याची कबुली दिली. याप्ररकणी आणखी तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली आहे.

मित्राला पाहण्यासाठी आरोपीने गाठले घटनास्थळ

आरोपी किसन बुधवारी पहाटे पुन्हा गरवारे प्रशालेत गेला. त्याने कंपाऊंटवरुन उडी घेऊन मारून आत प्रवेश केला. त्यावेळी दुसऱ्य़ा मजल्यावर त्याला राजन निपचित  पडलेला दिसून आला. त्यानंतर  किसनने थेट डेक्कन पोलीस ठाणे गाठून मला अटक करा, मी मित्राचा खुन केला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गरवारे शाळेत जाऊन खात्री केली. तेव्हा  राजनचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर गुन्ह्यातील साहित्य जप्त केले आहे.