खराब कामगिरीमुळे डू प्लेसिसचा कर्णधारपदाला रामराम, पण…

419

सततच्या खराब कामगिरीमुळे डू प्लेसिसने दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद सोडले आहे. एक दिवसीय, कसोटी आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून डू प्लेसिस पायउतार झाला आहे. सोमवारी त्याने ही घोषणा केली. डू प्लेसिसने कर्णधारपद सोडले असले तरी आगामी मालिकेसाठी संघासाठी उपलब्ध असणार आहे.

नवीन पिढीला संघाची धुरा सांभाळता यावी यासाठी आपण कर्णधारपद सोडत असल्याचे 35 वर्षीय डू प्लेसिसने म्हटले. नुकत्याच इंग्लंडविरुद्ध झालेल्या एक दिवसीय आणि टी-20 मालिकेमध्ये डू प्लेसिसला आराम देण्यात आला होता. डू प्लेसिसच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.

कर्णधारपद सोडताना डू प्लेसिस म्हणाला की, आता नवीन पिढीच्या हाती दक्षिण आफ्रिकन संघाची धुरा देण्याची वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद भुषवण्याची मला संधी मिळाली याबद्दल मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. तसेच हा सर्वात कठिण निर्णय होता, मात्र क्विंटन डी कॉकला मी सहकार्य करेन, असेही तो म्हणाला.

विश्वचषकामध्ये खराब कामगिरी
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एक दिवसीय विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकन संघाची कामगिरी खराब राहिली होती. डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळताना आफ्रिकन संघ सेमी फायनलही गाठू शकला नव्हता. तेव्हापासून तो दबावात होता. तसेच घरच्या मैदानावर हिंदुस्थान आणि इंग्लंडकडून पराभव स्वीकाराला लागल्याने त्याच्यावर टीकाही झाली होती. तसेच गेल्या 14 कसोटी डावामध्ये त्याने फक्त 20.92 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. फलंदाजीतील अपयश हे देखील कर्णधारपद सोडण्यामागील कारण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या