ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वे मार्गावर आज सायंकाळी लोकल लटकंती झाली. डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण स्थानकांदरम्यान एकापाठोपाठ एक लोकल उभ्या होत्या. त्यामुळे घरी निघालेल्या चाकरमान्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने मरेची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकुर्ली-कल्याण मार्गावर सिग्नल न मिळाल्याने डाऊन धीम्या मार्गावरील लोकल उभ्या होत्या. ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने लोकल सेवा लटकल्याची माहिती प्रवाशांनी दिली. मात्र लोहमार्ग पोलीस अथवा प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस माहिती न दिल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. सायंकाळी सवासातच्या दरम्यान हा प्रकार घडल्याने घरी निघालेल्या नोकरदार प्रवाशांची तासन्तास रखडपट्टी झाली.