
>> स्वप्नील साळसकर
‘‘युद्ध मिटातोवर बंटी तू भायर जावच नको बाबा!’’ ही सूचना आखाती देशातील कतारमध्ये नोकरीनिमित्त राहणाऱया देवगड तालुक्यातील साळशीमधील विजय महाजन यांच्या आईची. इराण-इस्रायल युद्धजन्य परिस्थितीमुळे व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून अनेक वेळा आईकडून लेकाची ख्यालीखुशाली सुरू आहे.
कतारमधील दोहा एअरवेजमध्ये काम करणाऱया विजयला आठवडय़ातून शुक्रवार, शनिवार सुट्टी असताना आई रोहिणी महाजन यांनी पह्नवर विचारले. आज मंगळवार ‘तू घरात कसो रे, नेहमी शुक्रवारची सुट्टी आसता’ त्यावर मुलगा विजय म्हणाला, घरातूनच ‘वर्क फ्रॉम होम ’ चालू आहे. तू टीव्हीवरील बातम्या पाहिल्या नाहीत का? आखाती देशांमध्ये युद्ध पेटले आहे. यावेळी आईने टीव्ही लावताक्षणी आकाशात हवेत फुटणाऱया मिसाईलचा आवाज काळीज चर्र करणारा होता. हे पाहिल्यावर ‘माका बाबा टेन्शन येता’ या भीतीमुळे मी आताच डॉक्टरकडे जाऊन आले. ‘बाबा थयली परिस्थिती कशी हा बघ रे’, बातमी बघून जीव वर खाली होता, असे ती विजयला म्हणाली. कतार एअरवेजमध्ये अधिकारी पदावर काम करणाऱया विजयने आईला सांगितले की, सध्या विमानसेवा बंद आहे. घरातून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे घरातूनच कामकाज सुरू आहे. येथे शेजारधर्म नाही, आपली काळजी आपणच घ्यायची!
आई ही आईच असते. त्यामुळे युद्धाच्या परिस्थितीची माहिती काही वेळा लपवावी लागते. घरातून काम करत असलो तरी खिडकीतून दिसणारे हवेतील आगीचे लोळ, स्पह्टांचा आवाज यामुळे छाती धडधडते. नेहमीचेच चेहरे बघायचे आणि जीव मारून राहायचे. काम करताना दहा वर्षे कधीच निघून गेली. आपली काळजी आपणच घ्यायची आणि जीव मुठीत धरून जगायचे.
विजय महाजन, कतार


























































