
फ्लॅट आणि दुकाने विक्रीच्या बहाण्याने खरेदीचा बनावट दस्तावेज तयार करून एकाने तिघांची तब्बल 1 कोटी 18 लाख 50 हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना बोपोडीतील दुय्यम निबंधक कार्यालयात घडला. याप्रकरणी काशिनाथ जाधव (वय 46, रा. कळस) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरालगत असलेल्या कळस येथील फेज 11 येथील सैनिक रेसिडेन्सीमधील फ्लॅट व दुकाने आरोपीने काशिनाथ यांना दाखविले. त्यानंतर बांधकाम नियंत्रक कार्यालयाचे बनावट शिक्के व बनावट स्वाक्षरी असलेले दस्ताऐवज दाखवून आरोपीने काशिनाथ यांच्यासह साक्षीदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बोपडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अनधिकृत फ्लॅट आणि दुकानांचा दस्त तयार केला. त्यानंतर काशिनाथ यांच्यासह इतरांची 1 कोटी 18 लाख 50 हजारांची फसवणूक केली. बनावट कागदपत्रे तयार करून ती कागदपत्रे उपयोगात आणल्याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.























































