पूजा साहित्याचे दर वाढले; गणेशोत्सवात महागाईचे विघ्न

लाडक्या बाप्पाच्या पूजेसाठी पूजा साहित्य घेण्यास बाजारात लगबग सुरू आहे. बाजारपेठा सजावटीच्या साहित्यांनी फुलल्या आहेत. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची जोरात तयारी सुरू असून, यावर्षी मंडपापासून ते पूजासाहित्यांपर्यंत सर्वच वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे.

गणेशोत्सव केवळ महाराष्ट्र, हिंदुस्थानाच नव्हे तर जगभरात गणपती उत्सवाची धूम, उत्साह, चैतन्य असते. गणेश चतुर्थी दिवशी प्रत्येक घरात गणपती बाप्पांची स्थापना केली जाते आणि मनोभावे पूजा केली जाते. गणेशोत्सवादरम्यान गणपती बाप्पांची सकाळ-संध्याकाळ पूजा केली जाते. गणपतीसाठी मोदकाचा नैवेद्य केला जातो. दरवर्षी डेकोरेशनमध्ये विविध आकर्षक वस्तू आणण्यासाठी बाजारात नागरिकांची धावपळ सुरू असते. आपापल्या परीने लाडक्या गणेशाच्या आगमनाची तयारी केली जाते. परंतु, गणपती पूजन करताना पूजा साहित्यांसाठी वस्तू आवश्यक असतात. गणपतीसाठी लागणारे पूजा साहित्य म्हणजे हळद, कुंकू, सुपारी, शेंदूर, गुलाल, लवंगा, पवित्र धाग्याची जोडी, दुर्वा, कापूर, दिवा, धूप, पंचामृत, माऊली, फळे, गंगाजल, कलश, अष्टगंध, गणेशाला फुलांची माळ, गुलाबपाणी, दिव्याची वात या सर्वांवरच जीएसटी लागल्याने यांच्या किंमतीत वाढ होऊन खारिक 30 ते 40 रुपयांनी तर हळद-कुंकू 100 ते 200 रुपयांनी वाढले आहे. यासंदर्भात पूजासाहित्य विक्रते दिंगबर भोर यांच्याशी संपर्क साधला. यावर्षी हळकुंडाचा आणि कापुराच्या दरात 20 टक्के वाढ झाली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय मोठ्या सुपारीची किंमत मागच्या वर्षी 8 रुपये होती. ती बाजारात आता 10 रुपयांस आहे. शिवाय नारळाच्या दरात वाढ होऊन 25 ते 30 रुपयांपर्यंत एक नारळ आहे. शिवाय चीनमधून येणाऱ्या मालास सरकारने बंदी घातल्याने पूजा साहित्यांना लागणारा कच्चा माल महागल्याचे हरे राम हरे कृष्ण सुगंधालयाचे मालक विक्रांत धुमाळ यांनी सांगितले.

महागाईचा फटका हा पूजा साहित्यांवर बसला आहे. याबरोबरच फुलांच्याही किमतीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे मंडई येथील जे. एच. सातारकर (तांबोळी) पूजा भांडारच्या प्रमुख मदिना तांबोळी यांनी सांगितले.