
अवकाळी पावसाचा मोठा फटका ऊसतोड मजुरांना बसला. सांगली येथील वसंतदादा कारखाना परिसरातील चारशेहून अधिक ऊसतोड मजुरांच्या झोपडीमध्ये पाणी शिरले. त्यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. आजअखेर झोपडय़ांतून पाणी काढण्याचे काम सुरू आहे; पण हा कारखाना चालविणारी दत्त इंडिया या कंपनीने मात्र या ऊसतोड मजुरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
सांगलीतल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात प्रत्येक वर्षी ऊसतोड मजूर अहिल्यानगर परिसरात झोपडी बांधून राहतात. यावर्षी चारशे मजूर कुटुंबासह आले आहेत. बुधवारी रात्री अचानक पाऊस झाल्याने मजुरांची त्रेधातिरपीट उडाली. त्यांना झोपेतून बाहेर पडता आले नाही. अंगावर चादर घेऊन आख्खी रात्र जागून काढली. लहान मुलांनाही कपडे गुंडाळून झोपडीमध्ये बसावे लागले. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे झोपडय़ांमध्ये पाणीच पाणी झाले. 400 झोपडय़ांतील अन्नधान्य, बैलांची पेंड भिजून गेली. ऊसतोड मजूर हंगामात पुरेल एवढे धान्य घेऊन येतात. त्यामुळे त्यांनी आणलेले सर्व धान्य भिजून गेले त्यामुळे आता खायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
सर्व झोपडय़ा पाण्याखाली गेल्या आहेत. झोपडीतून पाणी काढण्याचे काम दोन दिवस हे मजूर करीत आहेत. मात्र, हा कारखाना चालवणारी दत्त इंडिया कंपनीने या मजुरांची साधी दखलही घेतली नाही. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही, अशी तक्रार ऊसतोड मजुरांकडून होत आहे. उसाच्या शेतातही पाणी साचून राहिले आहे. शिवाय ट्रक्टरही शेतात जागच्या जागी थांबून राहिले आहेत. त्यामुळे काम नसल्याने ऊसतोड मजूर हवालदिल झाले आहेत.























































