आयसीसीने उघडून दिला इंग्लंडसाठी स्वर्गाचा दरवाजा

101
2019 - रोमहर्षक सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करत इंग्लंडने विश्वचषक पटकावला

द्वारकानाथ संझगिरी

असा सामना पुन्हा होणे नाही. नियतीलासुद्धा अशी पटकथा पुन्हा लिहिता येणार नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, 1983 साली लॉर्ड्सवर हिंदुस्थानी संघ जिंकला तेव्हा मी लॉर्ड्सवर होतो आणि रविवारी पुन्हा एक वेगळा इतिहास घडताना आहे.

इंग्लंड जिंकलं असं उद्या इतिहास सांगेल. प्रथमच विश्वचषक जिंकल्यामुळे उद्या इंग्लंडमध्ये आंनदोत्सव असेल. पण न्यूझीलंडचा संघ हरला असं मला मुळीच वाटत नाही. सर्वात जास्त चौकार कोणी मारले या निकषावर इंग्लंडला मिळालेले हे यश आहे. नाहीतर दोन्ही संघांचा या ट्रॉफीवर हक्क आहे. वाईट याच गोष्टीचे वाटते की, रेकॉर्डबुक शुष्कपणे ‘इंग्लंड विजयी’ ही ओळ लिहून जाईल. पण त्यामागचं नाटय़, थरार, ती शेवटच्या चेंडूपर्यंतची लढाई हे अनुभवायलाच हवं. करोडोंनी तो अनुभव टीव्हीवर अनुभवला. मला तो लॉर्ड्सवर प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. हिंदुस्थानी संघ नसतानाही माझ्यासकट सर्व हिंदुस्थानी या सामन्यात गुंतून गेले होते.

आज इंग्लंडमध्ये शॅम्पेन फक्त स्टोक्ससाठी फुटेल. त्या चषकावर एकच नाव टाकायचं झालं तर ते स्टोक्सचं टाकावं लागेल. वर्षभरापूर्वी तो कुठल्यातरी बारमधल्या दंगामस्तीमुळे संघाबाहेर होता. याक्षणी तो मैदानावर फलंदाजीचा सर्व सद्गुणांचा पुतळा वाटला. त्याने बरोबरचे साथीदार गमावले, पण ध्येय सोडले नाही. प्रयत्न सोडला नाही. त्याचं शरीर घामाने निथळत होतं. घामाला जर सोन्याची कधी किंमत मिळाली असेल तर ती स्टोक्सच्या घामाला होती.
त्याचबरोबर विल्यमसनचा संघ लढाईत कणभरही कमी पडला नाही. 242 धावांच्या मर्यादित टार्गेटचं संरक्षण करताना त्यांनी जी गोलंदाजी केली, जे क्षेत्ररक्षण केलं त्यामुळे त्यांना यापुढे ब्लॅक कॅट्सना ब्लॅक टायगर्स म्हणायला हवे. चित्यासारखे ते चेंडूवर तुटून पडले. पण मागे वळून पहाताना त्यांना दोन चुका कधी विसरता येणार नाहीत… तो गप्टीलचा थ्रो आणि बोल्टचा झेल घेताना सीमारेषेला लागलेला पाय. पण हे आता जाणवतं… कारण कुणाला वाटलं होतं की, पराभव इतका निसटता असेल?

शेवटच्या षटकात 15 धावा ही दबावाखाली सोपी गोष्ट नव्हती. स्टोक्स ऑनच्या छोटय़ा सीमारेषेकडे चेंडू भिरकावणार हे हेरून विल्यमसनने तिथे चार क्षेत्ररक्षक ठेवले. स्टोक्सने त्यांच्या डोक्यावरून षटकार ठोकला. गप्टीलच्या ओव्हर थ्रोने टार्गेट जवळ आणले. तरी इंग्लंडला जिंकता आले नाही. त्यामुळे मॅच सुपर ओव्हरवर गेली. पुन्हा स्टोक्स बटलरला घेऊन बाहेर आला. लढाई त्यालाच जिंकून द्यायचीय हे नियतीने ठरवलंच होतं. सर्वात अनुभवी म्हणून बोल्टच्या हातात विल्यमसनने चेंडू दिला. पण बोल्ट स्टोक्स-बटलरचा झंझावात रोखू शकला नाही. इंग्लंडने त्याच्या षटकाच्या वेळी नवख्या पण गुणवान आर्चरला चेंडू दिला. निशमबरोबर गप्टील केवळ अनुभवाच्या आणि मोठय़ा फटक्याच्या त्याच्या इतिहासामुळे आला. त्यांनी पुन्हा इंग्लंडच्या धावांना भोज्या केला. पण आयसीसीचा चौकारांचा नियम इंग्लंडला जिंकवून गेला.

सकाळी टॉस जिंकून न्यूझीलंडने फलंदाजी घेतली. प्रथमच मी खरंखुरं इंग्लिश वातावरण क्रिकेटच्या व्हॅटिकनवर अनुभवलं. लॉर्डस् भरलेलं. इंग्लंडच्या चाहत्यांच्या डोळय़ात वर्ल्ड कप जिंकायचं तरळलेलं स्वप्न, थोडी हिरवट खेळपट्टी, कदाचित टॉस जिंकल्यावर विल्यमसनला इंग्लंडला ‘पहिले आप’ म्हणायचा क्षणभर मोह झाला असेल. पण अंतिम सामन्यात दबाव, कमकुवत फलंदाजी, पाठलागाची ‘चढण’ याचा विचार करून सुरुवातीला स्विंग आणि बाऊन्सच्या कडक उन्हातून चालत जाऊन पुढे सावली शोधावी असं त्याला वाटलं असेल. गप्टीलची विकेट देऊन आर्चर-वोक्सच्या स्विंग-बाऊन्सची बिकट वाट त्यांनी पार केली. तरीही पॉवर प्लेमध्ये 1 बाद 37 ही मिळकत वाईट नव्हती. विल्यमसननेही सेट व्हायला वेळ घेतला, पण त्यावेळी डावखुऱया निकोल्सने त्यांना हूक, पूल, ग्लान्सने मौल्यवान धावा जमवून दिल्या. वोक्सला त्याने मारलेली स्क्वेअर कट लॉर्डस्मध्ये घुमली. लॉर्डस्वर पत्रकारांची प्रचंड गर्दी असल्यामुळे बऱयाच भाषिक पत्रकारांना एड्रीच आणि क्रॉम्प्टन स्टॅण्डमध्ये पत्रकार कक्ष तयार करून बसवलं होतं. मी क्रॉम्प्टन स्टॅण्डमध्ये असल्यामुळे मला प्रचंड आनंद झाला. 1986 च्या हिंदुस्थानी संघाच्या इंग्लिश दौऱयात माझी डेनिस कॉम्प्टनशी खूप चांगली ओळख झाली. आज कॉम्प्टन खेळत असता तर त्याच्या फटक्यांच्या आवाजानेही लॉर्डस् दुमदुमलं असतं. वन डेसाठी त्याची वृत्ती आदर्श होती.

थर्डमॅनमधून चेंडू नेणं हे विल्यमसनसाठी इथल्या मोटरवेवरून गाडी थांबवण्याएवढी अंगवळणी पडलेली गोष्ट आहे. इंग्लंडने पहिली दहा षटकं दोन स्लिप, एक गली विल्यमसनसाठी सातत्याने लावून त्याची भाकरी रोखण्याचा प्रयत्न केला. तो हळूहळू सेट झाला. समोरून निकोल्स साहसी होत होता आणि न्यूझीलंडचा धावफलक 21.2 षटकांत 1 बाद 100 असा भयंकर आशावादी चित्र रेखाटत होता. मुख्य म्हणजे विल्यमसनने पाया खणला होता आणि लंडनमधल्या ‘शार्ड टॉवर’पेक्षा मोठा टॉवर उभारण्याचे स्वप्न दाखवत होता. मी चहा घ्यायला बाहेर पडलो आणि लॉर्डस्चा एक टायचा टिपीकल इंग्लिश नॉट बांधून आणि सूट घालून आलेला म्हातारा हातातल्या वाईनचा पहिला घोट घेत म्हणाला, ‘‘न्यूझीलंडने 260 केले तर आमचं स्वप्न दुःस्वप्न होईल.’’ (Our Dream will turn into Nightmare) चहा पिऊन पुन्हा डेनिस कॉम्प्टन स्टॅण्डमध्ये स्थानापन्न होताना त्या म्हाताऱयाचा चेहरा माझ्या डोळय़ासमोर रेंगाळत होता. मी गालातल्या गालात हसत विल्यमसनच्या ‘शार्ड टॉवर’चं स्वप्न पाहत असतानाच शार्डचं बांधकाम कोसळलं. वूडचे वेगवान उसळते चेंडू फार मोठं काम करीत नाहीत हे पाहून कर्णधार मॉर्गनने प्लंकेटला आणलं आणि त्याने एक चांगला आऊटस्विंगर प्रसवला. विल्यमसनला कव्हर ड्राइव्ह करायला प्रवृत्त करेल असा! तो झेल घेताना बटलरच्या चेहऱयावरचं हास्य हे त्याच्या मुलाच्या जन्माच्या वेळच्या हास्याएवढं मोठं असावं. त्यांना कदाचित विल्यमसनची विकेटही चॅम्पियनशिपची प्रसूती वेदना वाटली असेल. शेवटचा प्रयत्न म्हणून विल्यमसनने रिह्यू घेतला, पण फलंदाजाला आपल्या बॅटला बॉल लागला की नाही याची जाणीव नक्की असते. प्लंकेटच्या अचूक टप्प्यावरच्या चेंडूला कव्हर ड्राइव्ह करण्याचा अर्धशतकवीर निकोल्सचा प्रयत्न चेंडूला स्वतःच्या स्टंपवर ओढवून घेत संपला आणि न्यूझीलंडला अपेक्षित टार्गेट गाठणं कठीण आहे असं जाणवलं. प्लंकेटच्या पावलांवर पाऊल ठेवून वूडने आपला टप्पा बदलला. इनस्विंगर जास्त खोलवर ठेवला आणि टेलर पायचित झाला. दुसरा मोहरा पडला तरी न्यूझीलंडने लढाई सोडली नाही. निशम आणि लॅथम या दोन डावखुऱया फलंदाजांनी संसाराची धुरा सांभाळली. इंग्लंडकडे झुकतोय असा वाटणारा लंबक स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला. आमच्या बाजूला एक न्यूझीलंडच्या पाठीराख्यांचा गट बसला होता. अगदी काळी जर्सी वगैरे घालून. त्यांचा उत्साह वाढला. प्रत्येक धावेला ते उठून उभे राहत. पुन्हा इंग्लंडच्या मदतीला प्लंकेट धावला. त्याने मधल्या यष्टीवर सिम होणारा चेंडू टाकला. निशमचा प्रयत्न तो जो रूटच्या डोक्यावरून फेकायचा होता. वेळ चुकली. मिड ऑफला जो रूटने पुष्पगुच्छ स्वीकारावा तसा झेल स्वीकारला.

43.3 षटकांत न्यूझीलंडने पाच विकेटस्वर 200 ला भोज्या केला, पण तिसऱया पॉवर प्लेने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांना मोठे फटके मारणे कठीण करून ठेवले. लॅथमने लढण्याचा प्रयत्न केला, पण धावसंख्या 260 पर्यंत नेण्यासाठी त्याला कुणाची साथ नव्हती. तरीही न्यूझीलंडने इंग्लंडपुढे ठेवलेले आव्हान हे हिंदुस्थानपुढे ठेवलेल्या आव्हानापेक्षा अंमळ जास्तच होतं.

बोल्टने विराट कोहलीला टाकलेल्या चेंडूची झेरॉक्स कॉपी जेसन रॉयसमोर ठेवली. तो रॉयचा आणि इंग्लंडच्या डावाचा पहिला चेंडू होता. पंचांनी नाबाद दिलं. पहिल्याच चेंडूवर विल्यमसनने रिव्हय़ू घेतला. चेंडूचा जवळपास 49 टक्के भाग स्टंपला लागत होता, पण पंचांचा निर्णय नाबाद होता. त्यामुळे 51 टक्क्यांनी रॉयची विकेट वाचली. ब्रेक्झिटचा निर्णयही यापेक्षा जास्त मताधिक्याने झाला होता. विराट कोहलीच्या बाबतीत उलट होतं. पंचांनी बाद दिलं होतं. त्यामुळे विराटला ‘एक्झिट’ घ्यावी लागली. इंग्लिश फलंदाज पहिली काही षटकं डोळय़ांसमोर चेंडू बरोबर क्रॉस ठेवून खेळले. हेन्रीच्या आऊटस्विंगरने आतापर्यंत इंग्लंडला धडाकेबाज सुरुवात करून देणाऱया रॉयची सुटकाच केली असं म्हणावं लागेल. विल्यमसनकडे लढण्यासाठी जास्त धावा नव्हत्या, पण त्याच्याकडे गुणवान गोलंदाज आणि जिगरबाज क्षेत्ररक्षक आहेत. इंग्लंडने 10 षटकांत 1 बाद 39 धावा केल्यानंतरही आणि पॉवर प्ले संपल्यावरही बराच काळ वर्तुळात सात क्षेत्ररक्षक ठेवले. 240 धावांचा किल्ला लढवताना समोरच्या संघाला आक्रमण करून हरवणे हा एकमेव पर्याय उरतो. खेळपट्टी सिम होते म्हटल्यावर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी टप्पा पुढे ठेवला. त्यामुळेच ड्राईव्ह करताना जो रूटसारखा क्लासिकल खेळाडू सापडला. चेंडू हलणाऱया वातावरणात यॉर्कशायरचा बेअरस्टॉ इंग्लंडच्या इतर फलंदाजांत जास्त चांगला वाटायला लागला. तो सरळ खेळत होता. मूव्हमेंट कव्हर करत होता. त्याने फर्ग्युसनला एक उत्तम ऑफ ड्राइव्ह मारला आणि पुन्हा फर्ग्युसनला तो बॅकफूटवर ढकलायला गेला. चेंडू जास्त उसळला आणि बॅटला धक्का देऊन स्टंपवर गेला.

कर्णधार विल्यमसनची क्षेत्ररचना, त्याचे गोलंदाजीतले बदल असे होते की त्याने दबाव इंग्लंडवर ठेवला. कर्णधार मॉर्गनवर त्यांनी अपेक्षित बॉऊन्सरचा मारा केला नाही. तो उसळणाऱया चेंडूवर पॉइंटच्या डोक्यावरून कट् मारतो. त्याला त्याच सामन्यात रॉयने पकडले. त्या क्षणापर्यंत इंग्लंडचं भवितव्य दोलायमान होतं. न्यूझीलंडमध्ये त्या सुमारास पहाट झाली असेल. न्यूझीलंड क्रिकेटच्या एका नव्या पहाटेची चाहूल त्यांना लागली असेल. पण…

हा पण महत्त्वाचा होता. 242चा पाठलाग हा एक-दोन भागीदारीत पार करता येतो. कारण विकेटस् गेल्या तरी धावांची गती बऱयाचदा कहय़ात असते. इंग्लंडला प्राणवायू देणारी भागीदारी स्टोक्स आणि बटलरची होती. अशी परिस्थिती स्टोक्सच्या आता अंगवळणी पडलीय. किंबहुना दबाव नसेल तर त्याला मोठी खेळी करायला कंटाळा येत असेल. स्टोक्स-बटलरने मोठी भागीदारी केली तरी धावांची गती वाढत होती. त्यांनी नेहमीचे क्रिकेटच्या पुस्तकातले फटके खेळले. जोखमी फटके खेळले नाहीत. त्यामुळे अपेक्षित धावांची गती वाढत गेली. ती वाढवण्यात आधी बटलर गेला आणि मग विकेटस् पडत गेल्या. न्यूझीलंडविरुद्ध खेळताना जे हिंदुस्थानी संघाचं झालं होतं तेच नेमकं झालं. पण स्टोक्स हा इंग्लंडचा सर्वात मोठा आधार होता. तो असा विजयापर्यंतचा रस्ता चुकणार नव्हता. एका षटकात जिंकण्यासाठी 15 धावा ही दबावाखाली सोपी गोष्ट नाही. बरोबर शेपूट होतं. स्टोक्सने शर्थ केली. त्याने क्रिकेटच्या स्वर्गाच्या दरवाजाला हात लावला; पण तो दरवाजा उघडू शकला नाही. त्यामुळे सुपर ओव्हर खेळावी लागली. पुन्हा संघाच्या पंधरा धावा झाल्या. शेवटी अधिक चौकाराच्या आधारावर (अर्थात प्लेइंग कंडिशन्सप्रमाणे) आयसीसीने इंग्लंडला स्वर्गाचा दरवाजा उघडून दिला.

आपली प्रतिक्रिया द्या