गोऱ्या सायबाची विकेट काढणारे जालीम औषध

  • द्वारकानाथ संझगिरी

बुलडोझरने एखादी इमारत पाडावी तशी या मालिकेत हिंदुस्थानी गोलंदाजांनी इंग्लिश क्रिकेट नावाची इमारत जमीनदोस्त केली. ती जमीनदोस्त होत असताना कुणी खेळपट्टीकडे बोट दाखवू शकत नव्हतं. तिने फिरकीला मदत केली, पण ती अतिरेकी नव्हती. मी तेच तर वारंवार म्हणत होतो, ‘जी शिकार बंदुकीने करता येते त्यासाठी तोफ का वापरता?’

कशाला हवी होती पहिल्या चेंडूपासून माती उडणारी खेळपट्टी? त्यांना हरवायला दोनऐवजी तीन दिवस लागले. काय फरक पडतो?

हिंदुस्थानी संघाने इंग्लंडला सर्व क्षेत्रांत पराभूत केलं. 1959 साली हिंदुस्थानी संघ इंग्लंडमध्ये सहा महिन्यांच्या दौऱ्यावर होता. पाच कसोटींत आपण मार खाल्ला. आमचा बाळू गुप्ते हा माजी कसोटीपटू त्यावेळी इंग्लिश लीगमध्ये खेळायचा. तो एकदा मला सांगत होता, ‘गोरे आम्हाला म्हणायचे, तुम्ही आमचा सुंदर समर खराब केलात.’  आता आम्ही म्हणतो, ‘तुम्ही आमचा क्रिकेट मोसम नासवलात. आम्हाला दर्जेदार खेळ पाहायचा होता. तुम्हाला फिरकी गोलंदाजी कशी खेळायची याची एबीसीडीसुद्धा माहीत नाही. पुढल्या वेळेला तुमच्याबरोबर हिंदुस्थानात तीन दिवसांचे कसोटी सामने का खेळू नयेत?’

पूर्वी गोरे असेच आपल्याला हिणवयाचे. कालचक्र फिरलं. चौथ्या कसोटीचा विचार करायचा तर दोन गोष्टींचा ऊहापोह करावा लागेल. एक पंत आणि वॉशिंग्टन सुंदरची फलंदाजी आणि दुसरं म्हणजे इंग्लंडच्या फलंदाजांचं पूर्णपणे नग्न झालेलं फिरकी गोलंदाजी खेळण्याचं तंत्र. ते मानसिकदृष्टय़ा इतके खचले होते की, विमानाच्या धावपट्टीवर खेळले असते तरी यापेक्षा पन्नास धावासुद्धा काढू शकले नसते. तुमच्याकडे जगातलं सर्वात सुंदर तंत्र असेल, पण मन हरलं असेल तर काहीही होऊ शकत नाही आणि मन घट्ट आणि सकारात्मक आणि आक्रमक असेल तर…? तर त्याचं नाव रिषभ पंत हवं.

जग एका बाजूला कोसळत असताना रिषभ पंत एक अशी खेळी खेळून गेला, जिचं वर्णन करायला कालिदासाची प्रतिभा हवी. आणि तो दुसरा वॉशिंग्टन सुंदर. क्रिकेट कळत नसतानाही अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टनने त्याची खेळी मिरवली असती.

इंग्लंडला पहिल्या डावात आघाडी मिळू शकते असं वाटू शकतं होतं. अश्या खेळपट्टय़ांवर रोहित शर्मा आधी ताजमहालाच्या संगमरवरावर खेळल्यासारखा खेळला होता. तो कुंथत होता. 49 धावांसाठी त्याने 144 चेंडू घेतले होते. त्याने वेगवान गोलंदाजासमोर फक्त 19 धावा केल्या होत्या. त्या आधी या मालिकेत त्याचा वेगवान गोलंदाजांसमोर स्ट्राइक रेट 81 होता, यावरून इतरांना पेपर किती जड जात होता हे कळेल.

रिषभ पंतने या खेळीत प्रचंड प्रगल्भता दाखवली. पहिल्या 55 धावा करताना त्याने 90 चेंडू घेतले. त्याने खेळपट्टीचं मन जोखलं. आणि मग आक्रमण केलं.

इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी तोपर्यंत उत्तम गोलंदाजी टाकली होती. पारंपरिक आणि रिव्हर्स असे दोन्ही स्विंग केले. इंग्लंड नव्या चेंडूकडे भागीदारी तोडण्याच्या दृष्टिकोनातून पाहत होता. पंतने नवा कडक चेंडू आक्रमणासाठी चांगला असा विचार केला. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. First stroke is  half the battle. त्याने  सर्वोत्कृष्ट स्विंग गोलंदाजांवर हल्ला करायचं ठरवलं.

अँडरसन 38 वर्षे 218 दिवसांचा. पंत 21 वर्षे 142 दिवसांचा. एका ठिकाणी दर्जा आणि अनुभव. दुसरीकडे, अफाट गुणवत्ता आणि सळसळतं तारुण्य. पंतने  थेट अँडरसनला पुढे सरसावत मिडऑफवरून फेकून दिलं. मोठय़ा गोलंदाजाला अशी ट्रीटमेंट देत नाहीत. आता काळ बदलला आहे. गोलंदाजांच्या नावाकडे पाहून कुणी खेळत नाही. ते फक्त चेंडू पाहतात. म्हणून मग पंतने अँडरसनला रिव्हर्स स्वीप यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून मारला. तीन शतकं 90 मध्ये चुकूनही त्याने शतक षटकार मारून पूर्ण केलं.

पंतने मॅच जिंकून दिली आपल्याला. पंतची बॅट कुमार गंधर्वप्रमाणे नवा राग गात होती आणि तबल्यावर वॉशिंग्टन सुंदर होता. बिचाऱ्याचं शतक हुकलं. तिथून पुढे मॅच जिंकण्याचे सोपस्कार अगदी झोकात अश्विन आणि अक्षर पटेलने केले. दोघांनी या मालिकेत अप्रतिम गोलंदाजी टाकली. खेळपट्टीबरोबर एकरूप होऊन टाकली. किंबहुना अजून काही दिवस इंग्लिश फलंदाजाना त्यांच्या बीअरमध्ये अक्षर, अश्विन दिसणार आहेत. मोगलांना संताजी-धनाजी दिसायचे तसे.

अश्विन त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अक्षरनं उद्घाटन जबरदस्त केलंय; पण ऑस्ट्रेलियातील कसोटीप्रमाणे ही कसोटी आठवत राहणार पंतने निर्माण केलेल्या वावटळीमुळे. एक वावटळ आली आणि इंग्लिश संघाच्या स्वप्नातला यशाचा गुलमोहर कोसळला.

आपली प्रतिक्रिया द्या