कल भी… आज भी… कल भी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

महेंद्रसिंग धोनी आज अडतीस वर्षांचा झाला.  श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने तीन झेल घेतले. एका फलंदाजाला यष्टिचीत केलं. तेव्हा त्याचं वय हा निव्वळ आकडा वाटला. त्यातला हार्दिक पांडय़ाच्या स्लोअरवनवर घेतलेला फर्नांडोचा झेल खासच होता. तो यष्टिचीत करतो त्यावेळी डोळय़ाची पापणीही  लवायची थांबते. तिलाही आश्चर्य वाटतं की, मी लवायच्या आत हा फलंदाजाला यष्टिचीत कसा करतो? रोहितच्या या विश्वचषकातल्या पाचव्या शतकाच्या डोळे दिपवणार्‍या प्रकाशात कदाचित धोनीची यष्टिरक्षणाची कामगिरी लपून जाईल; पण ज्यांना झगमगाटापलीकडचं दिसतं त्यांच्या नजरेतून महेंद्रसिंग धोनीची कामगिरी कधीही निसटणार नाही.

मला वाटतं की, धोनी हे फक्त वनडे आणि टी-20मधलं ऑल टाइम ग्रेट क्रिकेटपटूचं नाव नाही. हे एका वृत्तीचं नाव आहे. हे अनेक सद्गुणांचं नाव आहे. ते हिंदुस्थानी क्रिकेटच्या देदीप्यमान इतिहासातलं एक सोनेरी पान आहे. अगदी शंभर नंबरी सोनं, जे कधी काळवंडणार नाही. त्याचे ग्लोव्हज् अजूनही तरुण आहेत. त्याची बॅट तितकीशी तरुण नाही. ज्याच्याकडून हिमालयाएवढय़ा मोठय़ा कामगिरीची अपेक्षा ठेवली जाते त्याने आल्प्स पर्वताच्या उंचीचा परफॉर्मन्स दिला की ते अपयश मानलं जातं. पण यापुढचं कुठलंही अपयश या सोनेरी पानाच्या लखलखाटावर किंचितही परिणाम करणार नाही. फार इतिहासात मी जात नाही, पण सुनील गावसकरपासून हिंदुस्थानी क्रिकेटचा काळ मी डोळसपणे पाहिलाय. त्यात गावसकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली या प्रत्येकाने एक एक पान लिहिले. फक्त धावा, विकेटस्, झेल याचा विचार न करता हिंदुस्थानी क्रिकेटवर झालेला इम्पॅक्ट (परिणाम)चा विचार केला तर, धोनी या सर्वांच्या मांडीला मांडी लावून बसतो.

यादीतली सर्व मंडळी मुंबई, दिल्ली किंवा बंगळुरू, चंदीगडसारख्या मेट्रो शहरातली आहेत. इतरांबरोबरच्या शर्यतीत तिथले खेळाडू आधीच शंभर मीटर्स पुढे असतात. क्रिकेट तिथे वर्षानुवर्षे रुजलंय. ते एका भव्य संस्कृतीच्या पाळण्यात जन्म घेतात आणि शिक्षणाची उपमा देऊन सांगायचं तर, क्रिकेटच्या केंब्रिजमध्ये शिकतात. क्रिकेटची सुरुवात करताना धोनीला या सोयी नव्हत्या. मोठय़ा शहरातल्या मंडळीमध्ये वावरताना लहान शहरातली मंडळी सुरुवातीला बुजतात. रांचीचा धोनी मला कधी बुजताना दिसलाच नाही. इतरांपेक्षा शंभर मीटर्स मागे सुरुवात करून तो क्रिकेटच्या कॉण्ट्रिब्युशनच्या दृष्टीने वर उल्लेखिलेल्या क्रिकेटपटूंच्या पंक्तीत बसला. त्याची महत्त्वाकांक्षा कधी छोटी नव्हतीच. सुरुवातीला बिहारकडून खेळतानाची गोष्ट आहे. बिहारच्या खेळाडूंना 2000 सालच्या आसपास विचारलं गेलं, ‘‘तुमची  क्रिकेटमधली महत्त्वाकांक्षा काय?’’ काही सांगूच शकले नाहीत. धोनी म्हणाला, ‘‘हिंदुस्थानसाठी विश्वचषक खेळताना मला षटकार मारून विश्वचषक जिंकायचाय!’’ ठेवाल विश्वास? म्हणजे त्याचं मुंबईतलं 2011 साली षटकार मारून विश्वचषक जिंकून देणं हा योगायोग नव्हता, तर… ते थंड डोक्याने अचूक सोडवलेलं गणित होतं. अशा गोष्टी फक्त सिनेमात हीरोच्या बाबतीत घडतात.

मला 2003 चा विश्वचषक आठवतोय. त्यावेळी एका पार्टीत मला श्रीनाथ म्हणाला होता, ‘‘महेंद्र धोनी हे नाव लक्षात ठेव. तो मोठा होणार. त्याच्याइतका लांब चेंडू कुणीच मारत नाही.’’ त्यानंतर थोडय़ाच वर्षांत कळलं की, त्याच्याइतका जोरातही कुणी मारत नाही. ‘षटकार’ ही एकेकाळी अनेक फलंदाजांची बडीशेप होती. वनडेच्या काळात ती स्वीटडिश झाली. धोनीसाठी ती त्याच्या कारकीर्दीच्या एका टप्प्यात तूप लावलेली भाकर झाली. पूर्वी रणजी खेळताना दोघे-तिघे खेळाडू एकत्र राहत. त्यावेळी जो लांब चेंडू मारील त्याला जेवण करणं माफ असा संकेत होता. त्यामुळे धोनीला कधी जेवण करावं लागलंच नाही. हा किस्सा मला धोनीच्या जवळच्या एका बंगाली पत्रकाराने सांगितला. साक्षी याची कदाचित साक्ष काढू शकेल. हिंदुस्थानी क्रिकेटच्या नव्या युगात सचिनने प्रथम एक वेगळीच आक्रमकता आणली. सेहवागने पुढे नेली. धोनीने वनडेत ती ‘राक्षसी’ केली. त्याचे षटकार पाहताना मैदानावरचं गवत सुखावायचं; कारण गवतातून जाणारा फटका त्यांच्या अंगाची लाही लाही करतो. मी एकदा माझ्या कार्यक्रमात म्हटलं होतं, ‘‘कसायाकडे जाणारं बोकड, डॉक्टरांकडे येणारा पेशंट आणि धोनीकडे येणारा चेंडू यांच्या भावना सारख्याच असतात.’’ (टेक इट इझी माय डॉक्टर फ्रेंडस्). पण केवळ हाणामारी हे त्याच्या फलंदाजीचं रूप नाही. ते कदाचित बाहय़रूप असेल, पण अंतरंग प्रचंड बुद्धिमान आहे. तो एकेरी धावा अत्यंत कौशल्याने वेगात त्याची धावेची जजमेंट घेऊन धावतो. समोर जर चांगला पार्टनर असेल तर धोनीने कधी तीनच्याऐवजी दोन किंवा दोनच्याऐवजी एकच धाव घेतलीय असं मला कधीच जाणवलं नाही. वनडेतल्या डावातल्या आखणीच्या बाबतीत तर त्याचा हात कुणीच धरू शकत नाही. त्याला स्ट्राइकरेट कधी वाढवायचा हे त्याचं गणित शंभरपैकी 96 वेळा बरोबर आलंय. एकेकाळी शेवटच्या षटकापर्यंत मॅच नेऊन मॅच संपवणं ही आइस्क्रीम खाण्याएवढी सोपी गोष्ट तो करून टाकायचा. जणू काय दैवाने त्याला त्याच्यासाठी लिहिलेली पटकथा आधीच वाचून दाखवल्याप्रमाणे तो ‘शॉट’ द्यायचा. काही फलंदाजांना पाहिल्यावर गोलंदाजांना धडकी भरते त्यात एक धोनी होता. शेवटचं षटक टाकताना समोर धोनी असेल तर थंड असणारा गोलंदाज हा बर्फाचा पुतळा असू शकतो. माणूस नाही. धोनी भुताला घाबरायचा असं तो पत्रकार मला सांगत होता. पण तो फलंदाजी करताना गोलंदाजांना भूत की धोनी हा चॉईस दिला तर तो भूत पसंत करील. आज हीच गोष्ट धोनीच्या हातून घडत नाही. त्याचा स्ट्राइक रेट शंभरच्या आसपास असतो. मंद होत जाणार्‍या खेळपट्टीवर मॅच जिंकून द्यायला किमान दीडशेचा स्ट्राइकरेट लागतो. कित्येक दिवसांत मी धोनीचा हेलिकॉप्टर शॉट पाहिलेला नाही. एरवी तो हेलिकॉप्टरच काय, जेट उडवायचा आणि क्षेत्ररक्षक त्या फटक्याने ‘स्टॅच्यू’ केल्याप्रमाणे अत्यंत शिस्तीत स्तब्ध उभे राहायचे. तरीही हिंदुस्थानी संघाला त्याच्या फलंदाजीची गरज आहे आणि ती चौथ्या क्रमांकावर आहे. वडील नाही, तर आजोबांच्या अनुभवाने नातवाला बरोबर घेऊन फलंदाजी करीत त्याच्यातला कर्णधार बघता बघता मोठा झाला. एकदा रणजी खेळताना कर्णधाराने त्याला सात षटकांसाठी नेतृत्व करायला सांगितलं. प्रत्येक षटकानंतर तो आपल्या कर्णधाराला बाहेर बोलावत होता. जणू नेतृत्व त्याच्या रक्तातच नव्हते. 2007च्या वर्ल्डकपमधल्या हिंदुस्थानी संघाच्या अत्यंत मानहानिकारक पराभवानंतर सचिनने नेतृत्वासाठी धोनीचं नाव सुचवलं आणि तिथून त्याने हिंदुस्थानी क्रिकेटला, वनडे असो किंवा कसोटी, सर्वात वरच्या पायरीवर नेऊन ठेवलं. त्याच्या थंड डोक्याकडे पाहिलं की त्याचे पूर्वज एस्किमोच्या प्रदेशातून आले असावेत असं वाटतं. त्याला पाहताना मला थेट बियॉन बोर्ग आठवतो. आधुनिक काळातला असा थंड डोक्याचा कर्णधार म्हणजे अर्जुना रणतुंगा, आपला अजित वाडेकर आणि त्याआधी सर फॅन्क वॉरेल. यष्टीमागे उभं राहून तो टिपकागदाप्रमाणे प्रत्येक फलंदाजाचे गुण-दोष टिपतो. त्यानुसार तो गोलंदाजांना सूचना करतो आणि क्षेत्ररचना बदलतो. विराट कोहली कर्णधार असतानाही तो कर्णधार आहे असं वाटत राहतं आणि विराटसारखा मुलखाचा अहंकारी माणूसही त्याचा वडिलकीचा सल्ला मानतो. एकेकाळी तो कृष्णही होता आणि भीमही होता. कृष्ण तो अजूनही आहे. त्यातला भीम आता अधूनमधून दिसतो.

धोनीच्या निवृत्तीचा प्रश्न आता ऐरणीवर आहे. मला वाटते, ज्याला दुसर्‍याचे गुण-दोष कळतात त्याला स्वतःचं शरीरही कळत असावं. पण स्वतःचं शरीर त्याच्याशी काय गुजगोष्टी करतं ते त्याने जगाला सांगितलं पाहिजे असं नाही. याचा अर्थ असाही नव्हे की, ज्यांना धोनीची फलंदाजी मध्यम वयात आल्यासारखी वाटते ते त्यांनी बोलू नये किंवा लिहू नये. पण प्रत्येकाची इच्छा आहे की, निर्णय धोनीने स्वतः घ्यावा. कारण त्याच्या मॅच्युरिटीवर आपला पूर्ण विश्वास आहे. तो उगाचच रेंगाळणारा माणूस नाही. जागतिक स्टेज सोडणं सोपं नसतं. पण जेव्हा ते तो सोडेल तेव्हा तो हिंदुस्थानी क्रिकेटच्या इतिहासातला असा दिवस असेल की, आज त्याच्यावर टीका करणाऱयांनाही हुंदका आवरणार नाही. तो परफॉर्मन्सच्या दृष्टीनेही त्याच्या आयुष्यातला भव्य दिवस ठरावा.

[email protected]