सही बॉस!

216

द्वारकानाथ संझगिरी

विश्व चषकासाठी जाणारा हिंदुस्थानी संघ जाहीर झाला आणि माझी पहिली प्रतिक्रिया होती ‘सही बॉस’. प्रत्येक संघ निवडीच्या वेळी असे उद्गार तोंडातून निघतात असं नाही.

अर्थात तरी चुकचुकायला झालं. रहाणे असता तर बरं झालं असतं असं मनात येऊनही गेलं. तो केवळ मराठी आहे म्हणून नव्हे तर तो टी-20मध्ये आघाडीला जाऊ शकतो तर 50 षटकांच्या सामन्यात का नाही? किमान तिसरा आघाडीचा फलंदाज म्हणून? राहुल खेळला की दर्जेदार वाटतो, पण तो लिप इयर स्टार आहे. एक खेळी झाली की पुढच्या 29 दिवसांच्या फेब्रुवारीची वाट पाहायची. तोपर्यंत वर्ल्डकप अर्धा होऊ नये. अर्थात रहाणेचं तिकीट वर्षापूर्वीच कापलंय हे कळत होतं. फक्त प्रक्रिया आज पूर्ण झाली.

मला विजय शंकरला घेतल्याबद्दल सुखद धक्का बसला. मी त्याला अलीकडे वन डेत पाहिलं आणि पहिल्या दर्शनात तो भावला. त्याच्या फलंदाजीला तिसरा डोळा आहे हे त्यानं दाखवून दिलंय. मुख्य म्हणजे त्याला फलंदाज म्हणून घेतलंय आणि तेसुद्धा वरच्या फळीसाठी. मोठी जबाबदारी टाकली की बऱयाचदा त्या जबाबदारीमुळे खेळाडू आपला स्तर उंचावतात. त्याची गोलंदाजी मात्र दहा षटकांची मुळीच नाही. दैव कधी कधी गोलंदाजाला जादूची कांडी देते. ज्या दिवशी ती त्याला मिळेल तेव्हा तो एखाद्दोन जोडय़ा फोडेल.

san-j

महत्त्वाचा प्रश्न होता कार्तिक की पंत? अनेक माजी खेळाडूही रिषभ पंतच्या गुणवत्तेने भारावून गेले आहेत. अर्थात फलंदाजीच्या गुणवत्तेने! त्याला अजून यष्टिरक्षक मानायला वेळ आहे. आता तो कसाबसा हॉकी संघात गोलकीपर म्हणून बसेल. त्याच्याकडे मोठे फटके आहेत, टायमिंग आहे. त्याचं रक्त तपासलं तर प्लेटलेटस्पेक्षा आक्रमक पेशी जास्त असतील. पण फलंदाजी ही फक्त बॅटने, फक्त गुणवत्तेने खेळली जात नाही. तसं असतं तर रवी शास्त्री कसोटी आणि वन डे खेळू शकला नसता. त्यासाठी बुद्धिमत्ता, संयम, फटक्यासाठी चेंडूची योग्य निवड, समयसूचकता वगैरे गोष्टी लागतात. त्या बाबतीत तो अजून शाळेत आहे. उलट कार्तिक हा झंझावाती वाटणार नाहीं, पण गियर कधी आणि कसं बदलायचे ते फलंदाज म्हणून त्याला ठाऊक आहे. त्याने ते सिद्ध केलंय. मुख्य म्हणजे तो यष्टिरक्षकही आहे. ‘रक्षण’ या शब्दाच्या अर्थाला तो जागण्याचा प्रयत्न करतो. निव्वळ फलंदाज म्हणूनही तो खेळवला जाऊ शकतो.

एक वेगवान गोलंदाज संघात कमी आहे का? मला नाही वाटतं. हार्दिक पांडय़ाकडून गोलंदाजीची अपेक्षा आहेच ना? (मी मैदानावरच्या म्हणतोय) आणि स्पर्धा जून-जुलैमध्ये असली तरी विश्वचषकासाठी हिरव्या खेळपट्टय़ा असतील असं नाही. त्यामुळे वेगात डावखोरी फिरकी टाकणारा जाडेजा उपयोगी पडू शकतो. कधी तरी तो बॅटही तलवारीसारखी चालवतो अशी आशा ठेवायलाही हरकत नाही. त्याचं क्षेत्ररक्षण हा पगारापेक्षा जास्त मिळणारा बोनस आहे. सातत्याची मोठी अपेक्षा आपल्याला विराट-बुमराहकडून ठेवायची आहे. ते आपले भीम-अर्जुन! धोनीच्या रूपात कृष्ण आहेच. इतरांनी निदान नकुल-सहदेव व्हावे.

आपली प्रतिक्रिया द्या