बाराशे रुग्णांना ‘ई-संजीवनी’चा लाभ लवकरच 106 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा

109

>> भाग्यश्री कुलकर्णी

कोरोनाच्या संकट काळात अन्य आजारांनी त्रस्त रूग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळावा म्हणून सुरू केलेल्या ‘ई संजीवनी ओपीडी’या टेलीकन्सल्टेशन सुविधेचा लाभ अडीच महिन्यात नाशिक जिह्यातील बाराशेहून अधिक रुग्णांनी घेतला आहे. राज्यात नाशिकसह पाच शासकीय रूग्णालयात ही सुविधा खऱया अर्थाने रूग्णांसाठी संजीवनी ठरली आहे. लवकरच जिह्यातील 106 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही सुविधा सुरू होईल, असे जिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. संजय गांगुर्डे यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्यामुळे इतर आजारांसाठीही रुग्ण रुग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांना घरबसल्या वैद्यकीय सल्ला उपलब्ध व्हावा, या हेतूने केंद्र सरकारचा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मे महिन्यापासून ई-संजीवनी ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, संभाजीनगर, भंडारा व नांदेड जिह्यातील शासकीय रुग्णालयांनी पुढाकार घेत त्या-त्या जिह्यात ही सुविधा उपलब्ध करून दिली. सी-डॅक कंपनीच्या माध्यमातून हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळावर नोंदणी करताच आपल्या मोबाईलवर ओपीडीसाठी एक ओटीपी क्रमांक येतो. तो टाकून आवश्यक माहिती भरल्यानंतर संबंधित टेलीकन्सल्टेशन सेंटरशी संपर्क साधता येतो. स्मार्टफोनद्वारे कॉल केल्यास रुग्णाला तेथील डॉक्टरांशी व्हिडिओकॉलद्वारे संवाद साधणे शक्य होते. रविवार वगळता सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड यावेळेत रुग्ण या सुविधेद्वारे तज्ञांशी संपर्क साधून आपल्या आरोग्यविषयक शंकांचे निरसन करू शकतात.

नाशिक जिल्हा रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ञ डॉ. संजय गांगुर्डे हे या ओपीडीचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉ. सारिका वाघ, डॉ. प्रतिभा पगार, डॉ. तुषार देवरे, डॉ. सपना सोनवणे, डॉ. ऋत्विक पाटील अशा तज्ञ डॉक्टरांचे पथक नियमितपणे याद्वारे रुग्णांना मार्गदर्शन करत आहेत.

काही रुग्णांना बालरोगतज्ञ, मानसोपचार तज्ञ किंवा हृदयरोग तज्ञांशी बोलण्याची इच्छा असते. त्यानुसार संबंधित तज्ञांचे कन्सल्टेशनही रुग्णाला दिले जाते. डॉ. नीलेश जेजुरकर, विठ्ठल काळे, डॉ. पंकज गाजरे, डॉ. प्रमोद गुंजाळ आणि डॉ. प्रदीप पवार आदी तज्ञ मंडळी नियमितपणे यात सहभागी होतात.

आरोग्य अधिकाऱयांचे प्रशिक्षण पूर्ण
– ग्रामीण भागातील रुग्णांना या संकेतस्थळावर नोंदणी करणे,त्यानंतर येणारा ओटीपी क्रमांक टाकून ऑनलाइन कन्सल्टेशन घेण्यात अडचणी येतात. काही ठिकाणी रेंज नसल्याने नीट संवाद होऊ शकत नाही. यावरही मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिह्यातील 106 प्राथमिक आरोग्य केंद्र ही आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून काम करत आहेत. तेथील आरोग्य अधिकायांना जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले गेले आहे. लवकरच जिल्हा परिषदेच्या सहाय्याने या आरोग्य केंद्रांमध्ये संगणक,स्मार्टफोन उपलब्ध करून देऊन गावपातळीवरही ही सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या