देशात भविष्यात ई-वे उभारणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

358

वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रात भविष्यात मोठे बदल होणार आहेत. इलेक्ट्रिक गाडय़ांच्या दृष्टीने भविष्यात ई-वेच्या उभारणीसाठी आम्ही पावले उचलणार आहोत. यासंदर्भात लवकरच आपण स्वीडनचा दौरा करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. शुक्रवारी मुंबई-पुणेदरम्यान धावणाऱया पहिल्या खासगी इलेक्ट्रिक लक्झरी बसचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.

‘प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्यूशन्स’तर्फे ही बस सुरू करण्यात आली असून ती देशातील पहिलीच इलेक्ट्रिक इंटरसिटी बस ठरली आहे. ‘प्रसन्न पर्पल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न पटवर्धन, मित्रःहा मोबिलिटीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अंकित सिंघवी उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, दिल्ली-मुंबई महामार्गाचे काम पुढील तीन वर्षांत पूर्ण होईल. यामुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर केवळ 12 तासांत कापणे शक्य होणार आहे. या महामार्गाचा दिल्ली ते जयपूर हा पहिला टप्पा दिवाळीपर्यंत सुरू होणार आहे.

2 तासांच्या चार्जिंगमध्ये 300 किमी धावणार
पहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस 12 मीटर लांब व 2 बाय 2 लक्झरी कोच असलेली आहे. दररोज मुंबई-पुणे मार्गावर ही बस दोन वेळा धावणार आहे. या बससाठी पुणे आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी चार्जिंग स्थानक उभारण्यात आले असून एकदा दोन तास पूर्ण चार्जिंग केल्यानंतर ही बस 300 किमी. धावू शकते. बसमध्ये 43 आरामदायी सीटस् आहेत. शिवाय सामानासाठी प्रशस्त जागा, यूएसबी चार्जिंगची सोय आहे.

आपली प्रतिक्रिया द्या