
>> ह प्रा. शरयू जाखडी
जिज्ञासू, विद्वान व वाङ्मयीन योगदान देणाऱया संत स्त्रियांत महानुभाव पंथाच्या संत साध्वी महादायिसा ऊर्फ महदंबा यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. महदंबा उढर्फ महदायिसा ही प्रतिभासंपन्न कवयित्री महानुभाव काळात उदयाला आली. इ.स. 1233 ते 1302 चक्रधरांच्या पश्चात महानुभाव पंथ बांधणीचे काम करणाऱ्या नागदेवाचार्याची ही चुलतबहीण होती. महानुभाव पंथात तिच्या विद्वत्ता प्रचुर, प्रेमळ व्यक्तिमत्त्वामुळे महदंबेला ज्येष्ठ तपस्वीनीचा मान प्राप्त झाला. गोविंदप्रभूकडील कृष्ण-रुख्मिणीच्या विवाह सोहळ्याच्या उत्सवात महदंबेने भाग घेऊन उत्स्फूर्तपणे ‘धवळे’ या काव्यप्रकाराची रचना केली. या आद्य कवयित्रीचे मूळ नाव रुपाई. तिच्यातील आचारविचारांची प्रगल्भता पाहून चक्रधरांनी तिचे नाव ‘महदायिसा’ असे ठेवले. चक्रधर व गोविंदप्रभूंच्या भेटीनंतर महदंबेच्या आयुष्याला वेगळा आयाम मिळाला. तिच्या व्यक्तिमत्वाला विद्वता व बुद्धितेजाची द्वार होती. ‘स्मृतिस्थळ’, ‘लीळाचरित्र’, ‘ऋद्धिपूर वर्णन’ इत्यादी महानुभाव ग्रंथात महदायिसेचे संदर्भ आलेले दिसून येतात. महदायिसेने धवळे, गर्भकांड, मातृकी, आरत्या रचना केल्या आहेत.






























































