भूकंपाने मोरक्को हादरले; 1 हजारांहून जास्त मृत्यू, शेकडो जखमी

आफ्रिका देशातील मोरक्कोमध्ये शुक्रवारी रात्री मोठा भूकंप झाला. यात आतापर्यंत 1 हजार 37 जणांचा मृत्यू झाला असून 672 जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल 6.8 इतकी होती. 120 वर्षांतील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा भूकंप मानला जात आहे. या भूकंपामुळे कोटय़वधींचे नुकसान झाले असून लोक हजारो लोक बेघर झाले आहेत.

शुक्रवारी रात्री स्थानिक वेळेनुसार रात्री 11.11 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू मराकेशपासून जवळपास 70 किमी दक्षिणेमधील अल हौज प्रांतातील इघिल शहरात होता. मोरक्कोमधील अल-हाऊज आणि तरुडांट प्रांत मोठा भूकंप झाला. अर्ध्याहून अधिक लोकांचा या दोन ठिकाणी मृत्यू झाला. तर उआरजजाते, चिचाऊआ, अजीलाल, युसूफिया प्रांताशिवाय, मरक्केश, अगादीर, कैसाब्लांका या ठिकाणी भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. हजारांहून जास्त लोकांचा यात मृत्यू झाला असून मृत्युमुखींची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. मोरक्कोमधील नागरिकांनी भूकंपाचे अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत.