
हिंगोली शहरासह जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा नागनाथ, हिंगोली, सेनगाव व वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये बुधवार, 10 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचा 4.5 रिश्टर स्केलचा हादरा बसला. भूकंपाच्या धक्क्याने नागरिक मोठ्या संख्येने घराच्या बाहेर रस्त्यावर आले होते. भूकंपाचे धक्के जवळपास 10 सेकंदाहून अधिक
जाणवल्याचे औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील बापूराव घोंगडे यांनी सांगितले.
मागील काही वर्षांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. आज बुधवारी सकाळी हिंगोलीसह नांदेड, परभणी, जालना, यवतमाळ जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तर हिंगोली शहरासह जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा नागनाथ, हिंगोली, वसमत व सेनगाव या तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये सकाळी 7.14 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 4.5 अशी झाली आहे. भूकंपाच्या धक्क्याने नागरिक मोठ्या संख्येने घराच्या बाहेर रस्त्यावर आले होते. सुदैवाने या धक्क्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, मागील काही वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रामेश्वर तांडा, ता. वसमत जिल्हा हिंगोली येथे 10/07/2024 सकाळी 07:14 च्या सुमारास 4.5 रिश्टर स्केलचा भूकंपाची नोंद झाली आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विज्ञान केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.
रामेश्वर तांडा भूकंपाचे केंद्र –
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र आहे. जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झाले नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी तत्काळ दगड काढून घ्यावेत, असे आवाहन हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
निमटोक येथील घराला तडा –
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील निमटोक या गावातील विधवा महिला विमलबाई श्रीरंग कपाटे यांच्या घराला काही ठिकाणी तडे गेले आहेत. तर पेठवडगाव येथील बुरुजाचा वरील काही भाग पडला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील निमटोक या गावातील एका घराला भूकंपाच्या धक्क्यामुळे तडे गेले आहेत. तर पेठवडगाव येथील बुरुजाचा काही भाग पडला आहे.