मशरूम खा, नैराश्य आणि अस्वस्थतेवर मात करा! वाचा सविस्तर फायदे

चवीला मटणासारखा लागणारा, अत्यंत स्वादिष्ट, रुचकर आणि पौष्टिक असलेला हा पदार्थ. फक्त जेवणातच वापरला जातो, असे नाही तर आरोग्याच्या अनेक तक्रारींवरही अत्यंत गुणकारी आहे. इतर वेळी भात, भाजी, बिर्याणी, पुलाव, सलाड, करी, सूप, स्नॅक्स अशा विविध पदार्थांत हे वापरले जात असले तरी नैराश्य, जीव घाबरल्यासारखा होणे (एंग्जायटी), भीती अशा विविध प्रकारच्या मानसिक आजारांवर याचा वापर केला जातो, असा निष्कर्ष एका संशोधनामुळे लागला आहे.

अनेक आजारांवर मात करणाऱ्या या भाजीचे नाव आहे ‘मशरूम’. पाहूया, मशरूम खाण्याचे नेमके फायदे काय आहेत. मशरूममध्ये अँण्टी इंफ्लमेटरी, अॅमिनो अॅसिड ही तत्त्वं असतात. एका अभ्यासानुसार, मशरूमचे सेवन केल्याने सिझोफ्रेनियाचा धोका टाळता येऊ शकतो.

पांढऱ्या मशरूममध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे एंग्जायटी म्हणजे जीव घाबराघुबरा होणे, अस्वस्थता, भिती वाटणे यासारखे त्रास दूर होतात. याशिवाय नैराश्यावर मात करण्यासाठी मशरूम खाणे फायदेशीर ठरते. मेंदूमध्ये न्यूरॉनचे प्रमाण वाढवण्याकरिता आहारात मशरूम खाणे आवश्यक आहे. मेंदूकरिता आवश्यक असलेले न्यूरॉनचे प्रमाण १० टक्के वाढवण्याची क्षमता मशरूममध्ये आहे

यामध्ये असलेले सेलेनियम आणि एर्गोथियोनिन ही तत्त्वे रोगप्रतिकारक्षमता वाढवतात. मशरूममध्ये जीवनसत्त्व ए, बी आणि सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे अनेक आजारांशी लढण्याकरिता शारीरिक क्षमता वाढता. सेलेनियम शरीराला आतून निरोगी ठेवते.

मशरूममध्ये अँण्टीऑक्सिडंट शरीरातील पेशी नष्ट होण्यापासून रक्षण करते तसेच शरीरात जीवनसत्त्व डीची कमतरता असल्यास बरेच आजार उद्भवतात. या भाजीत जीवनसत्त्व डी मुबलक प्रमाणात आहे. दररोज मशरूम खाल्ल्याने शरीराला आवश्यक तेवढे जीवनसत्त्व डी मिळू शकते.

फायबर असल्याने पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते. 5 पांढऱ्या मशरूममध्ये 20 कॅलरी असतात. मशरूम कर्करोगाशी निगडीत गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. अभ्यासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की, प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच यामुळे कोलेस्ट्रॉल किंवा एचडीएल सुधारू शकते आणि ट्रायग्लिसेराईड्स कमी करू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.